रतन टाटा यांनी जपलेली मूल्ये धोक्यात; टाटांच्या दोन भगिनींनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:50 IST2025-11-04T14:48:48+5:302025-11-04T14:50:59+5:30
विश्वस्त पदावरून मेस्त्री यांना हटविण्याचा निर्णय सूडबुद्धीने घेतल्याचा दावा

रतन टाटा यांनी जपलेली मूल्ये धोक्यात; टाटांच्या दोन भगिनींनी व्यक्त केली चिंता
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या दोन भगिनी शिरीन जिजीभॉय (वय ७३), डायना जिजीभॉय (७२) यांनी टाटा ट्रस्टमधील चालू घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात मेहली मेस्त्री यांना टाटा ट्रस्टमधून विश्वस्तपदावरून हटविण्याचा इतर विश्वस्तांनी सूडबुद्धीने निर्णय घेतला, अशी टीका त्यांनी केली.
टाटा ट्रस्टमधील वादासंदर्भात प्रथमच या दोन भगिनींनी जाहीर मतप्रदर्शन केले आहे. शिरीन जिजीभॉय यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत रतन टाटांनी अनेक समस्यांचा मुकाबला केला होता. पण, त्यांना टाटा ट्रस्टच्या भवितव्याबद्दल सर्वांत जास्त काळजी वाटत होती. त्याबद्दल ते कधी कधी आमच्यासमोर मन मोकळे करत असत.
रतन टाटा यांच्या आणखी एक भगिनी डायना जिजीभॉय यांनी सांगितले की, रतन टाटांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले असतानाच टाटा ट्रस्टमधील अनेक गोष्टी सर्वांसमोर आल्या आहेत. रतन टाटांचा वारसा, त्यांनी जपलेली मूल्ये आता धोक्यात आली आहेत, असे वाटू लागले आहे. रतन टाटा यांचे निकटवर्तीय असलेले मेहली मेस्त्री यांना विश्वस्त म्हणून मुदत वाढविण्यास टाटा ट्रस्टमधील तीन विश्वस्तांनी संमती दिली नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात मेहली यांना पदावरून हटविण्यात आले आहे.