रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 14:55 IST2025-08-01T14:51:47+5:302025-08-01T14:55:42+5:30

मालेगावच्या निकालावर बोलताना त्यांनी मंत्रिपदावेळी घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे, हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही साधला निशाणा

Rami will get Olympic status, Manikrao Kokate will be honored by being given the Sports Ministry; Congress harshwardhan Kokate Target Mahayuti | रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा

रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा

मुंबई - राज्यातील भाजपा युती सरकार हे बेशरम व लाचार आहे.  विधानसभेत रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा सोडून क्रीडा मंत्रालय देऊन उचित सन्मानच केला आहे. आता रमी या खेळाला ऑलिंम्पिक दर्जा देतील व तो खेळणाऱ्याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानितही करतील असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ विविध मुद्द्यांवरून महायुती सरकारवर निशाणा साधला. मालेगाव स्फोटाच्या निकालावर ते म्हणाले की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने काल निकाल दिला असला तरी खरा निकाल देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत एक दिवस आधीच दिला होता, हे यानिमित्ताने खेदाने नमुद करावे वाटते. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो व रंगही नसतो पण भाजपा दहशतवादाला रंग देऊन त्यांचा अजेंडा राबवत आहे. तर खोटारडेपणा व दुटप्पीपणा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावाचे पैलू आहेत. मालेगावच्या निकालावर बोलताना त्यांनी मंत्रिपदावेळी घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे. एका घटनेला एक न्याय व दुसर्‍याला दुसरा न्याय हे नैतिकता व शपथेला धरून नाही. फडणवीस यांनी नैतिक व संविधानिक मुल्ये पाळली नाहीत त्यामुळे ते अधर्मी आहेत असा टोला त्यांनी लगावला. 

तसेच सामाजिक विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला. हे सरकार चुकीच्या पद्धतीने सत्तेवर आले आहे हे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत त्यामुळे ते चुकीचीच कामे करणार. सामाजिक न्याय विभाग वा आदिवासी विभागाचा निधी हा कोणत्याही परिस्थितीत दुसरीकडे वळवता येत नाही पण सरकार सातत्याने नियमांचे उल्लंघन करत असून संविधानाची पायमल्ली करत आहे असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. 

दरम्यान, जे लोक पक्ष सोडून जात आहेत त्यांची चर्चा होत होती पण ज्या पक्षात जायचे त्यांच्याशी योग्य सौदा काही होत नव्हता आता सौदा झाल्याने ते गेले असतील. याला गळती म्हणणे चुकीचे ठरेल. काँग्रेस हा विचार धारेवर चालणारा पक्ष आहे. कोणाच्या जाण्याने पक्ष कमजोर होत नाही. ५०-५० वर्ष एकाच कुटुंबात पक्षाची पदे दिली गेली आता नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळत आहे. जे गेले त्यांनी दिल्या घरी सुखी राहावे असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं.

Web Title: Rami will get Olympic status, Manikrao Kokate will be honored by being given the Sports Ministry; Congress harshwardhan Kokate Target Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.