शरद पवारांनी शिवसेना फोडली, उद्धवजींनी आत्मपरीक्षण करावे: रामदास कदम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 05:39 IST2022-07-20T05:39:02+5:302022-07-20T05:39:50+5:30
शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला शरद पवार आणि अजित पवार हे नेते जबाबदार असल्याची टीका करत याबाबत उद्धव ठाकरेंनी यांनी आत्मपरीक्षण करावे, असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केले.

शरद पवारांनी शिवसेना फोडली, उद्धवजींनी आत्मपरीक्षण करावे: रामदास कदम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला शरद पवार आणि अजित पवार हे नेते जबाबदार असल्याची टीका करतानाच शिवसेनेच्या आजच्या स्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, असे मत माजी मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले. ते वृत्त वाहिन्यांशी बोलत होते.
मी ५० वर्षे शिवसेनेत झिजलो, ज्यांच्यासाठी एवढे केले त्यांनीच माझी हकालपट्टी केली. उद्धव साहेब... तुम्ही आणखी किती जणांची हकालपट्टी करणार आहात, तुम्हाला मातोश्रीवर बसून तेवढेच काम उरले आहे. शरद पवार शिवसेना फोडण्यात यशस्वी झाले. बाळासाहेब असताना जे शरद पवारांना जमले नाही ते पवारांनी उद्धवजींनासोबत घेऊन केले आणि डाव साधला. नशीब अडीच वर्षांत हे थांबले, पाच वर्षांत शिवसेना पूर्णच संपली असती, असे कदम म्हणाले.
बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडली. मातोश्रीला दगाफटका केला. ठाकरे कुटुंबीयांचा विश्वासघात केला आणि स्वत:च्या कृतीला योग्य आहे हे दाखविण्यासाठी त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न रामदास कदम आणि काही बंडखोर नेते करीत आहेत. २०१९ मध्ये सत्ता न मिळाल्याचा राग भाजप शिंदेंना हाताशी धरून काढत आहे. - महेश तपासे, प्रवक्ते, राष्ट्रवादी
खेड मतदारसंघात रामदास कदम पराभूत झाले, उद्धवजींनी त्यांना मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर पाठवून पुढे मंत्रीही केले. रामदास कदम यांनी मुलालाच विधानसभेचे तिकीट दिले. उद्धवजींना त्यांनी खूप त्रास दिला आहे. पक्षधोरणाविरुद्ध ते सतत बोलले आहेत. गद्दारीबद्दल त्यांनीच आत्मपरीक्षण करावे. - खा. अरविंद सावंत, शिवसेना