“मी असताना राज ठाकरेंची गरज काय? मनसेला महायुतीत घेऊ नये”; रामदास आठवले स्पष्ट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 18:15 IST2024-02-27T18:12:26+5:302024-02-27T18:15:24+5:30
Ramdas Athawale News: राज ठाकरेंना घेऊन भाजपाचा फायदा होणार नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

“मी असताना राज ठाकरेंची गरज काय? मनसेला महायुतीत घेऊ नये”; रामदास आठवले स्पष्ट बोलले
Ramdas Athawale News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि उमेदवारी यांवरील चर्चा आणि बैठका यांना वेग आला आहे. काही पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर, भाजपासह अनेक पक्ष लवकरच यादी जाहीर करतील, असे सांगितले जात आहे. मनसे पक्ष महायुतीत सहभागी होऊ शकतो, अशा चर्चा राजकीय वर्तुळात असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. मनसेला महायुतीत घेऊ नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे. या मुख्य ताकदीला मदत करणारी आरपीआयची छोटी ताकद आहे. निवडून आणण्यासाठी काही मतांची गरज असते, ती जबाबदारी आरपीआयची आहे. त्यामुळे नेत्यांना नम्र विनंती आहे की, मी राज्यसभेचा खासदार असलो तरीही, लोकसभेचा माणूस आहे. यामुळे रिपब्लिकन पक्षाला जागा देणे आवश्यक आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत रिपाइंला सोलापूर व शिर्डी या दोन जागा द्याव्यात अशी आग्रही मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
मी असताना राज ठाकरेंची गरज काय? मनसेला महायुतीत घेऊ नये
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांबाबत रामदास आठवले यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, राज ठाकरे स्वतंत्र लढण्यातच त्यांचा फायदा आहे. त्यांना घेऊन भाजपाचा फायदा होणार नाही. मी असताना राज ठाकरेंची आवश्यकाता नाही असे माझे मत आहे. राज ठाकरे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आहेत. परंतु, ते महायुतीत येणार नाहीत. ते आले तरी त्यांना घेऊ नये असे माझे मत आहे. कारण आम्हाला ज्या दोन जागा मिळतील, असे वाटत आहे, त्याही मग मिळणार नाहीत, असे रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, महायुतीकडे मागणी केलेल्या दोन जागा मिळाल्यास, शिर्डीतून स्वतः रामदास आठवले आणि सोलापुरातून राजा सरवदे निवडणूक लढवतील, असे सांगितले जात आहे.