- योगेश पांडे नागपूर - विधानपरिषदेचे सभापतीपद मागील २९ महिन्यांपासून रिक्त असून अखेर निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. १९ डिसेंबर रोजी सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी भाजपचे प्रा.राम शिंदे यांचे नाव महायुतीकडून उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. शिंदेसेनेकडून उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र विधानपरिषदेतील संख्याबळाच्या आधारावर शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
७ जुलै २०२२ रोजी रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यापासून विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असला तरी अद्यापही खातेवाटप झालेले नाही. शिंदेसेनेकडून काही महत्त्वाच्या पदांची मागणी करण्यात आली होती. त्यात विधानपरिषदेच्या सभापतीपदाचा देखील समावेश होता. जर विधानपरिषदेचे एकूण गणित बघितले तर भाजपचे सर्वाधिक सदस्य आहेत. त्यामुळे भाजपने राम शिंदे यांचे नाव लावून धरले. राज्यपालांनी पाठविलेल्या कार्यक्रमानुसार बुधवारी १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. १२:०५ वाजता प्रस्तावांची छाननी होणार आहे.
सभापतीपदाच्या निवडणूकीसाठी माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी पक्षनेत्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.