शिंदेंचे धक्कातंत्र! दसरा मेळावा गाजवणाऱ्या ज्योती वाघमारेंना राज्यसभेचे तिकीट, बड्या नेत्यांना बाजूला सारून उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 16:49 IST2026-03-05T16:41:17+5:302026-03-05T16:49:27+5:30
डॉ. ज्योती वाघमारेंच्या रूपाने 'लाडक्या बहिणी'ला राज्यसभेची उमेदवारी

शिंदेंचे धक्कातंत्र! दसरा मेळावा गाजवणाऱ्या ज्योती वाघमारेंना राज्यसभेचे तिकीट, बड्या नेत्यांना बाजूला सारून उमेदवारी
Rajya Sabha Election 2026: महाराष्ट्र राज्यसभेच्या निवडणुकीत गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बड्या नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू असतानाच, अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या आणि आपल्या वक्तृत्वाने अल्पावधीत ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. ज्योती वाघमारे यांना शिंदेसेनेने राज्यसभेचे तिकीट जाहीर केले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या नाट्यमय घडामोडीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कोण आहेत डॉ. ज्योती वाघमारे?
सोलापूरतून डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपला प्रवास सुरू केला. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणून काम करत असताना दलित पँथरच्या माध्यमातून सामाजिक लढा जिवंत ठेवला होता. हाच वारसा घेऊन ज्योती वाघमारे यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी प्राप्त केली. पाच भाषांवरील प्रभुत्व आणि आंबेडकरी चळवळीचा गाढा अभ्यास ही त्यांची मुख्य ओळख आहे.
उमेदवारीमागचे राजकीय गणित
मंत्री संजय शिरसाट यांनी ज्योती वाघमारे यांच्या निवडीचे समर्थन करताना स्पष्ट केले की, "ही उमेदवारी म्हणजे सामान्य शिवसैनिकाचा सन्मान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेप्रमाणेच राजकारणातही आपल्या बहिणीला ताकद दिली आहे."
निवडणूक बिनविरोध होणार?
राज्यातील सात जागांसाठी ही निवडणूक होत आहे. भाजपने आधीच आपले चार उमेदवार मैदानात उतरवले आहेत. घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी आणि लोकशाहीची प्रतिष्ठा राखण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. शिरसाट यांनी स्पष्ट केले की, जास्तीचे अर्ज भरून गोंधळ निर्माण करण्यापेक्षा समोपचाराने ही प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे.
अंतर्गत नाराजीचा सूर
एकीकडे वाघमारेंच्या नावाची चर्चा असतानाच, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. "चार वेळा खासदार राहून आणि संसदरत्न पुरस्कार मिळवूनही माझी उपेक्षा झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, "शिंदे साहेब सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत, कोणाचीही नाराजी ते नक्कीच दूर करतील," असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.
डॉ. वाघमारेंची आक्रमक भूमिका
गेल्या अडीच वर्षांत टीव्हीवरील चर्चासत्रे असोत किंवा दसरा मेळाव्यातील भाषणे, डॉ. वाघमारे यांनी उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार प्रहार केले आहेत. विशेषतः आदित्य ठाकरे आणि संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देणारा चेहरा म्हणून त्या पक्षात ओळखल्या जातात. आता हीच आक्रमकता त्या दिल्लीच्या संसदेत कशी गाजवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.