मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राजीनामा देत भाजपाच्या वाटेवर असल्याने राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. तसेच स्वाभिमानीच्या शिलेदारांनी ज्वलंत प्रश्न घेऊन मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माझ्या स्वाभिमानी शिलेदारांनो, अशी साद घातली आहे. तसेच भाजमधील पक्षांतरावरही टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या प्रचंड राजकीय अस्थैर्य निर्माण झालेले आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बहुतेक सर्वच राजकीय नेते व कार्यकर्ते सत्तेच्या दिशेने पळत सुटताना दिसत आहेत. जे येत नाहीत त्यांच्या मागे चौकशीची ईडापिडा लावली जाते. आर्थिक कोंडी केली जाते आणि त्यानांही नाईलाजाने भरती व्हावे लागते. अशा पध्दतीने महाराष्ट्रात विरोधी पक्ष शिल्लक राहतोय काय नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.देशातील राजकीय वाटचाल एकपक्षीय राजवटीच्या दिशेने निघालेली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच एकत्र काम केल्यानंतर एकमेकांना शिव्याशापही देत बसू नका असे सांगितले. माझे किंवा माझ्या सहकाऱ्यांचे काही निर्णय कदाचित चुकले असतील पण त्यामागे व्यक्तीगत स्वार्थ निश्चितच नव्हता व असणारही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.