Raju Shetti News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी ९२ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत उर्वरित गावांची मोजणी करून भूसंपादनाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. परंतु, अनेक जिल्ह्यातून या शक्तिपीठ महामार्गाचा विरोध वाढताना पाहायला मिळत आहे. यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. याबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक होत सरकारला इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांच्या शेपटीवर पाय देऊ नका, नाहीतर फणा काढल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी शक्तिपीठ महामार्गामुळे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. सरकारला याबाबत गुडघे टेकण्यास भाग पाडू, असा इशारा देण्यात आला. शक्तिपीठ महामार्गाविरोधात भरपावसात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी राजू शेट्टी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ०६ जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा करणार आहेत. या पूजेच्या आधी मुख्यमंत्र्यांना राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्ती करावी. राज्यातील जनतेवर व शेतकऱ्यांवर अन्यायकारी शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची व शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी पांडुरंगाने द्यावी, या मागणीसाठी ०४ जुलैला पंढरपूर येथे साकडे घालणार आहे, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.
सरकार कर्जमुक्तीस टाळाटाळ करत आहे
महायुतीच्या वतीने निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. आता सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस कर्जमुक्तीस टाळाटाळ करत आहे. एकीकडे कर्जमुक्ती करण्यास पैसे नसताना, कुणाचा तरी व्यवसाय वृद्धींगत व्हावा, कुणाच्या तरी कंपन्यांची भरभराट व्हावी, याकरिता राज्यातील शेतकरी व सामान्य जनतेवर शक्तिपीठ महामार्गाचा वरवंटा फिरवत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली.
दरम्यान, राज्यातील १२ जिल्ह्यात शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्यावतीने सविनय कायदेभंग करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी व सामान्य जनतेच्यावतीने पंचगंगा पुलावर जवळपास दोन तास राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको करून शक्तीपीठ व सरकारच्या विरोधातील जनभावना दाखविण्यात आले.