उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:34 IST2025-12-18T15:33:46+5:302025-12-18T15:34:08+5:30
Shiv sena-MNS BMC Election Seat Sharing Update : एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना 'महायुती'च्या वाटणीत एकमेकांचे पाय खेचत आहेत. भाजपाने शिंदे शिवसेनेला ५० जागांवर लढण्याची ऑफर दिली आहे. तर शिंदेना १०० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत.

उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 'शिवसेना (UBT)' आणि 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)' यांच्यात ऐतिहासिक युती होण्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना १२५ जागांवर, तर राज ठाकरे यांची मनसे ९० जागांवर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.
ज्या प्रभागांमध्ये मराठी मतदारांचे वर्चस्व आहे, तिथे ५०-५० टक्क्यांचा फॉर्म्युला राबवला जाणार आहे. तर उर्वरित प्रभागांमध्ये ६०-४० किंवा ताकदीनुसार जागांची विभागणी केली जाईल. विशेष म्हणजे, मुस्लिम बहुल भागांत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आपले उमेदवार उभे करेल, असेही समजते. झी न्यूजने याचे वृत्त दिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या युतीची अधिकृत घोषणा २३ डिसेंबर २०२५ रोजी होण्याची शक्यता आहे. या दिवशी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर येऊन मुंबईच्या मतदारांना साद घालू शकतात. गेल्या दोन दशकांपासून स्वतंत्र राजकारण करणाऱ्या या दोन भावांनी 'मुंबई' आणि 'मराठी अस्मिता' वाचवण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव शिवसेनेकडे गेल्यावेळी जिंकलेल्या ८४ जागा आहेत. त्या सर्व आपल्याकडेच रहाव्यात अशी मागणी त्यांची आहे. परंतू, मनसे देखील काही मतदारसंघात मजबूत आहे, यामुळे मनसे या ऑफरवर तयार नाहीय. यामुळे या भागातील मतदारसंघ वाटले जाणार आहेत. शिवाय काँग्रेस येणार नसली तरी शरद पवार राष्ट्रवादी सोबत आली तर त्यांच्यासाठी 10-15 जागा सोडाव्या लागणार आहेत.
राजकीय समीकरणे बदलणार?
एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना 'महायुती'च्या वाटणीत एकमेकांचे पाय खेचत आहेत. भाजपाने शिंदे शिवसेनेला ५० जागांवर लढण्याची ऑफर दिली आहे. तर शिंदेना १०० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. भाजपा १३० ते १५० जागा लढवण्यावर ठाम आहे. यामुळे एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १२५ जागा सुटल्या तर शिंदेंच्या गोटात मोठी खळबळ उडणार आहे. मुंबई कोणाची आणि खरी शिवसेना कोणाची हे प्रश्न सोडविण्यासाठी आता मुंबई महापालिकेची निवडणूकच उत्तरदायी ठरणार आहे.