ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:26 IST2025-06-09T13:25:22+5:302025-06-09T13:26:10+5:30

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक माजी नगरसेवक पक्षात आणण्यात शिंदेसेनेला यश मिळत आहे.

Raj Thackeray's MNS Sanjay Turde and Uddhav Thackeray's leader Chandrahar Patil will join Eknath Shinde's Shiv Sena today | ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश

मुंबई - राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. मनसे-उद्धवसेनेच्या युतीआधीच दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोमिलन होत असल्याचं दिसून येते. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेला मोठा धक्का दिला आहे. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे. संध्याकाळी ६ च्या सुमारास हा पक्षप्रवेश सोहळा ठाणे इथं एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडेल. त्यामुळे मुंबईत मनसेचे एकनिष्ठ मानले जाणारे संजय तुर्डे यांच्या जाण्यानं कलिना, चांदिवली भागात मनसेला धक्का बसणार आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक माजी नगरसेवक पक्षात आणण्यात शिंदेसेनेला यश मिळत आहे. आतापर्यंत ५० हून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईतील हे पक्षप्रवेश उद्धवसेनेसाठी डोकेदुखी ठरत होती. त्यात अलीकडेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. त्यात मुंबईतील मनसेचे एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे(Sanjay Turde) यांना पक्षात घेण्यात शिंदेसेनेला यश आले आहे. तुर्डे यांच्यासोबत कलिना परिसरातील अनेक मनसे पदाधिकारी शिंदेसेनेत दाखल होणार असल्याची माहिती आहे.

कोण आहे संजय तुर्डे?

मुंबई महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(MNS) ७ नगरसेवक निवडून आले होते. परंतु कालांतराने ६ नगरसेवकांनी वेगळा गट बनवून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. मनसेच्या या ६ नगरसेवकांनी राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केल्यानं राज ठाकरेंना(Raj Thackeray) मोठा धक्का बसला होता. पण त्यावेळी संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक होते ज्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली नाही. प्रभाग क्रमांक १६६ चे माजी नगरसेवक असलेले संजय तुर्डे यांनी मी मनसे सोडणार नाही असं म्हणत राजनिष्ठा दाखवून दिली होती. मात्र आता तेच संजय तुर्डे शिंदेसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. संध्याकाळी ६.३० वाजता त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंसोबतच उद्धव ठाकरेंनाही धक्का दिला आहे. सांगलीचे उद्धवसेनेचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हेदेखील शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास ठाण्यातील कियारा बॅंक्वेट हॉल इथं हा पक्षप्रवेश होणार असून चंद्रहार पाटील यांना शिंदेसेनेत मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती आहे. पुढील काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना हा जोरदार धक्का दिला आहे. 

Web Title: Raj Thackeray's MNS Sanjay Turde and Uddhav Thackeray's leader Chandrahar Patil will join Eknath Shinde's Shiv Sena today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.