मुंबई - येत्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्या राजकीय युतीचा उदय होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्रित येतील अशी चर्चा सुरू होती. त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढलेली दिसून आली. मात्र आज उद्धव ठाकरे स्वत: संजय राऊत, अनिल परब या नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी भेटायला गेले. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला मनसेचे बाळा नांदगावकर हेदेखील उपस्थित होते.
मुंबईसह ठाणे, नाशिक, पुणे यासारख्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथे ठाकरेंची मोठी ताकद आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत कुठेही जोखीम घेण्याची या दोन्ही पक्षांची तयारी नाही. त्यामुळेच युतीबाबत दोन्ही बाजूने सकारात्मक वातावरण आहे. गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे पुन्हा शिवतीर्थ निवासस्थानी गेले त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. संजय राऊत आणि अनिल परब हेदेखील उद्धव ठाकरेंसोबत असल्याने महापालिका निवडणुकीची प्राथमिक चर्चा या बैठकीत करण्यात आली.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने महापालिकेत सत्ता राखली होती. या निवडणुकीत भाजपाने कडवे आव्हान उद्धव ठाकरेंना दिले होते. मात्र भाजपा आणि ठाकरेंच्या पक्षातील विजयाच्या जागा फार कमी होत्या. त्यात राज ठाकरे यांचीही मुंबईत मोठी ताकद आहे. राज ठाकरे यांच्या मनसेने सुरुवातीच्या काळात १३ आमदार निवडून आणले परंतु त्यानंतर मनसेला उतरती कळा लागली. मात्र मनसे आणि राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आजही त्यांच्या पाठीशी कायम आहे. आतापर्यंत कुठलीही युती किंवा आघाडी न करता राज ठाकरे यांच्या मनसेला मतदान करणारे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. ही मते मनसेच्या विजयासाठी पुरेशी नसली तरी एखाद्या पक्षाच्या बाजूने आल्यास त्याचा मोठा फायदा त्या पक्षाला मिळू शकतो. त्यामुळेच ठाकरे बंधू यांचं येणे भाजपासाठी जड जाण्याची शक्यता आहे.
दसरा मेळाव्यात युतीची घोषणा?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात शिवतीर्थ निवासस्थानी अडीच तास बैठक झाली. या बैठकीत महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी काहीही न बोलता निघून गेले. त्यामुळे अद्यापही दोन्ही बाजूने सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. परंतु येणाऱ्या दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून ठाकरे बंधू यांच्या युतीची घोषणा होऊ शकते अशी चर्चाही सुरू आहे. ठाकरे आणि शिवाजी पार्क हे नाते सगळ्यांना माहिती आहे. मुंबईतल्या मराठी माणसांमध्ये ठाकरे बंधू यांच्याविषयी आपुलकी आहे. त्यामुळे युतीच्या दृष्टीने या दोन्ही भावांनी टाकलेले पाऊल दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांसाठी उत्साह देणारे आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळेच दसरा मेळाव्याच्या आधी दोन्ही पक्षातील चर्चांना अधिक बळकटी मिळून युतीच्या घोषणेचा मुहूर्त दसरा मेळाव्यात साधणार असेच बोलले जात आहे.