राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 08:17 IST2025-07-30T08:06:11+5:302025-07-30T08:17:30+5:30
Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आता वाट वाकडी करून उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना भेटण्यासाठी शिवतीर्थवर जाणार का, यावर मनसैनिकांमध्ये चर्चा असल्याचे म्हटले जात आहे.

राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
Raj Thackeray And Uddhav Thackeray: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत चाललेल्या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे बंधू हे काही निमित्त मात्र एकत्र येणार की, महापालिका निवडणुकीत युती करणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवत विजयोत्सव साजरा करण्यासाठी वरळी येथे एकत्र येऊन गळाभेट घेतलेल्या ठाकरे बंधूंनी पुन्हा एकदा गळाभेट घेतली. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी थेट मातोश्रीवर पोहोचले. अनेक वर्षांनी राज ठाकरे यांनी थेट मातोश्री गाठल्यामुळे अनेकाच्या भुवया उंचावल्या, तर मनसैनिक आणि शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. राज ठाकरे यांनी मन मोठे करत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. परंतु, आता वाट वाकडी करून उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना भेटण्यासाठी शिवतीर्थवर जाणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
वाकडी वाट कधी करणार?
ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे आता शिवसैनिक, मनसैनिक गहिवरले. काही वर्षापूर्वी हृदयविकाराचा त्रासामुळे उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल होते. तेव्हा डिस्चार्ज घेतल्यावर उद्धव यांना 'मातोश्री'वर सोडायला राज हे स्वतः मोटार चालवत आले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या जुन्या 'कृष्णकुंज' व नव्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी अनेक वर्षे पाऊल ठेवलेले नाही. अशा भेटीसाठी सद्यस्थितीत राज आणि अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे मुहूर्तही टळले आहेत. त्यामुळे आता उद्धव यांना वाकडी वाट करूनच शिवतीर्थावर जावे लागले, असे मनसैनिक बोलत आहेत, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, मातोश्रीवर गेल्यानंतर राज ठाकरे हे आवर्जून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वास्तव्य असलेल्या खोलीत गेले. बाळासाहेबांच्या आसनापुढे नतमस्तक झाले. काही वर्षांपूर्वी उद्धव यांना हृदयासंबंधीचा त्रास जाणवल्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांचा दौरा अर्धवट सोडत लीलावती रुग्णालय गाठले होते. त्यावेळी स्वतः गाडीचे सारथ्य करत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीपर्यंत आणले होते. हा अपवाद वगळता शिवसेना पक्षातून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर कधीच गेले नव्हते.