मनसेला मोठा धक्का! ३५ मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा एकाच वेळी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’; राजीनामा सत्र सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 20:52 IST2022-04-15T20:52:16+5:302022-04-15T20:52:52+5:30
मुंबई आणि मराठवाडा विभागातील एकूण ३५ मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

मनसेला मोठा धक्का! ३५ मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा एकाच वेळी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’; राजीनामा सत्र सुरुच
मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळावा आणि त्यानंतर लगेचच ठाण्यात आलेल्या उत्तरसभेत मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील मुद्दा लावून धरला. मशिदींवरील भोंगे उतरवावेच लागतील, अशी ठाम भूमिका घेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिले आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या या भूमिकेवरून मनसेत दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबईसह मराठवाड्यातील ३५ पदाधिकाऱ्यांचा आपल्या पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळातूनही संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनसेवर जोरदार टीका केली आहे. आता खुद्द मनसेमधून राज ठाकरेंच्या भूमिकेला कडवा विरोध होताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला पुण्यातील मनसेचे नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी विरोध दर्शवला होता. यानंतर मनसेच्या मुस्लीम बांधव पदाधिकाऱ्यांमध्ये यावरून नाराजी असल्याचे चित्र राजीनामा सत्रावरून दिसत आहे.
मुंबई, मराठवाड्यातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मनविसेचे सरचिटणीस फिरोज पी. खान यांच्यासोबत मुंबई आणि मराठवाडा विभागातील एकूण ३५ मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. फिरोज खान यांच्या सहीनिशी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादीच राजीनामापत्रावर नमूद करण्यात आली आहे. यामध्ये सचिव, शहराध्यक्ष. प्रसिद्धी माध्यम प्रमुख, जिल्हा सचिव, वाहतूक सेना उपाध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, मनसेचे कल्याणमधील प्रदेश सचिव इरफान शेख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला. यावेळी इरफान शेख यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट देखील टाकली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’, या मथळ्याखाली इरफान यांनी फेसबुकवर राजीनाम्याची पोस्ट लिहिली आहे. खरे तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असे वाटले नव्हते. मात्र आपण ज्या पक्षात काम करतो, ज्या पक्षाला आपले सर्वस्व समजतो तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भूमिका घेत असेल आणि स्वतः पक्षाध्यक्षच जर भूमिका घेत असतील तर नक्कीच पक्षाला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मत इरफान शेख यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले.