"बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडणार नाही, असं उद्धव ठाकरे लिहून देणार का?"; मनसेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 10:21 AM2022-07-02T10:21:13+5:302022-07-02T10:23:30+5:30

उद्धव ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांकडून घेणार एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र

Raj Thackeray Led MNS Sandeep Deshpande slams Uddhav Thackeray over honesty certificate | "बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडणार नाही, असं उद्धव ठाकरे लिहून देणार का?"; मनसेचा सवाल

"बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडणार नाही, असं उद्धव ठाकरे लिहून देणार का?"; मनसेचा सवाल

Next

Shivsena vs MNS, Sandeep Deshpande: महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या त्रासाला कंटाळून एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदारांनी बंडखोरी केली. शिंदे गटाच्या या निर्णयामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद गमवावे लागले. या बंडामुळे शिवसेनेला प्रचंड मोठा धक्का बसला असून शिवसेनेत उभी फूट पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर पुन्हा एकदा नव्याने पक्षबांधणीचे आव्हान आहे. अशातच शिवसेनेकडून पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जातोय. गेल्या काही दिवसांतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. पण यावरूनच मनसेने शिवसेनेला डिवचलं.

"कोणताही पक्ष किंवा संघटना विश्वासावर चालत असते. तुमचा विश्वास नसल्यामुळे तुम्ही पक्षाचे शिवबंधन बांधून घेता, एकनिष्ठतेचं प्रतिज्ञापत्र लिहून घेता हे योग्य नाही. या साऱ्याचा असा अर्थ होतो की तुमच्यासोबत असलेले शिवसैनिक यांच्यावर तुमचा विश्वास नाही. आता तुम्ही पत्र लिहून घेतलं आणि नंतर शिवसैनिकांनी मागणी केली की बाळासाहेबांचे हिंदुत्व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोडणार नाहीत असं त्यांनी लिहून द्यावं. तर तसं प्रतिज्ञापत्र लिहून देण्याची पक्षप्रमाखांची तयारी आहे का?", असा खोचक टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला.

"शिवसेना नक्की कोणाची याबाबत जी चर्चा सुरू आहे त्यावरही संदीप देशपांडे यांनी मत व्यक्त केले. ज्यांच्याकडे ४० आमदार आहेत त्यांची शिवसेना की बाळासाहेबांच्या आग्रहाखातर राज ठाकरे यांनी ज्यांच्या नावाचा प्रस्ताव कार्याध्यक्ष पदासाठी ठेवला त्यांची शिवसेना हे लोकांनी ठरवायला हवं. तसाही या साऱ्या गोष्टींचा फैसला कोर्टातच होईलच", असेही संदीप देशपांडे म्हणाले.

दरम्यान, शिवसेना नेतृत्वाविरोधात बंडखोरी करत भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. काल रात्री हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

Read in English

Web Title: Raj Thackeray Led MNS Sandeep Deshpande slams Uddhav Thackeray over honesty certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.