सावित्रीबाई स्मारकासाठी धरसोडपणाचे धोरण नको, राज ठाकरे यांची सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:21 IST2025-01-04T13:19:02+5:302025-01-04T13:21:18+5:30
राज ठाकरे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले...

सावित्रीबाई स्मारकासाठी धरसोडपणाचे धोरण नको, राज ठाकरे यांची सरकारवर टीका
मुंबई : राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा फेरआढावा घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाबाबत असे धरसोडपणाचे धोरण नको, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर केली. तसेच पुण्यातील भिडे वाडा येथील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
राज ठाकरे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. तत्कालीन राज्य सरकारने २ वर्षांपूर्वी भिडे वाड्याचे रूपांतर सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकात करण्याची घोषणा केली. परंतु या स्मारकाचे काम अनेक कायदेशीर गुंतागुंतीत अडकल्याचे समोर आले. मोठ्या महापुरुषांच्या स्मारकांसाठी कायदेशीर लढाया लढाव्या लागतात, हे दुर्दैव आहे, असे ते यावेळी म्हणाले.
सावित्रीबाई फुले यांचे स्मारक म्हणजे पुतळा किंवा एखादे संग्रहालय इतके मर्यादित असू नये. त्याला आधुनिकतेची जोड द्यावी. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा आढावा घेणारा बहुभाषिक साउंड आणि लाईट शो, डिजिटल लायब्ररी स्मारकामध्ये असावे. हे सगळे काम एका कालमर्यादेत पूर्ण करावे. इतर स्मारके लालफितीमध्ये अडकतात, तसे हे स्मारक अडकू नये, असेही राज ठाकरे म्हणाले.