Raj Thackeray Latest News: 'तुम्हाला आज जे सांगतोय, ते सत्य आहे. शपथपूर्वक सांगतोय. ज्यांच्याशी बोललो त्या लोकांसोबत भेटी करून देईन. पहलगामची घटना घडल्यानंतर मला अनिल शिदोरेंचा मेसेज आला की, तुम्ही बोललात तसे झाले', असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल मोठे विधान केले. काश्मीरमध्ये पर्यटकांची हत्या करतील हे मला आधीच जाणवू लागलं होतं, असा दावा करताना त्यांनी यामागील कारणही सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात मुलाखत झाली. मुंबईतकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पहलगामधील दहशतवादी हल्ल्याबद्दल एक मोठं विधान केले.
वाचा >>'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
राज ठाकरे म्हणाले, "मी काय म्हणालो आणि त्याचे तुम्ही काय अर्थ काढता. त्यावर मी तो अर्थ नाही, त्याचा अर्थ हा आहे, असे सांगायला मी का येऊ? आता पहलगामचं जेव्हा झालं. त्यानंतर मी बोललो. अनेकांना वाटलं की मी देशाच्या विरोधात काहीतरी बोललोय. कसलं देशाच्या विरोधात? माझी प्रतिक्रिया एकदा ऐका. ते सगळं झाल्यावर राज ठाकरे आठवला की युद्ध परवडणारे नाही. अनेक लोक बोलली मला. अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या", असे राज ठाकरे म्हणाले.
युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल -राज ठाकरे
राज ठाकरेंनी पुढे बोलताना पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, "तुमचा कोणाचा विश्वास बसणार नाही. ती व्यक्ती इथे नाहीये. अनेकजण आहेत. त्यांच्या मी तुम्हाला भेटी करून देईन. मी कोणी ज्योतिषी नव्हे. मी अनेकदा सांगितलं. मी मागच्या वेळीही सांगितलं होतं आठवतं तुम्हाला? युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. तीन चार वर्षापूर्वी. यावेळी मी ही गोष्ट फक्त बोललो नाही."
राज ठाकरे म्हणाले, सत्य सांगतोय शपथपूर्वक सांगतोय
याच मुद्द्यावर ते पुढे म्हणाले, "याच कारण मला कोणत्याही प्रकारची हिंट द्यायची नव्हती. कारण राज ठाकरेंनी ही हिंट दिली असं व्हायला नको म्हणून मी सार्वजनिक ठिकाणी ही गोष्ट बोललो नाही. पण तुम्हाला जे सांगतोय आता, ते सत्य आहे. शपथपूर्वक सांगतोय. गेले वर्षभर आमचे अनिल शिदोरे असतील किंवा आमचे इतर... मी त्यांच्यासोबत तुमच्या भेटीही करून देईन."
"अनेकांशी मी वर्षभर बोलतोय की, काश्मीरमध्ये काहीतरी मोठी घटना घडेल. आणि मी हेही बोललो होतो की, पर्यटकांना मारतील. ३७० कलम रद्द झाल्यानंतरची काश्मीरची जी परिस्थिती होती. आपले लोक तिकडे जात होते. खेळत होते. सगळ्या गोष्टी होत्या. मला ते जाणवत होतं काश्मीरबद्दलचं. काय आहे की, शांतता आणि सन्नाटामधील फरक तुम्हाला समजला पाहिजे", असे राज ठाकरे म्हणाले.
हल्ला होईल असं राज ठाकरेंना का जाणवलं?
"शांतता ही आल्हाददायक असते. सन्नाटा ही गंभीर गोष्ट असते. काश्मीरमध्ये मला जे जाणवत होतं, तो सन्नाटा होता. त्यातील बाहेर काय गोष्टी पडतील मला माहिती नाही. परंतू मी आता पण तुम्हाला मोबाईल दाखवयाला तयार आहे. ज्या दिवशी ही घटना घडली, अनिल शिदोरेंचा मला मेसेज आला. तुम्ही बोललात तसे झाले. मी भविष्यवेत्ता नाही. माझे काही ठोकताळे आहेत. माझे काही अंदाज आहे. मला आतून काही गोष्टी वाटतात ही गोष्ट होईल. मी त्या प्रकारे सांगतो. मी हे निवडणुकीसाठी बोलत नाही", असे राज ठाकरे म्हणाले.