लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अतिवृष्टीच्या जोरदार तडाख्याने हैराण झालेल्या महाराष्ट्राला बुधवारी पावसाच्या सरींनी थोडा श्वास घ्यायला मोकळीक दिली. असे असले तरी पूरस्थिती कायम आहे. सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणे तुडुंब भरले आहेत. प्रकल्पांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे राज्यातील प्रमुख नद्या भरून वाहत आहेत. परिणामी नदी आणि नाल्याकाठच्या गावांना अजूनही पुराचा वेढा आहे. काही गावांचा संपर्क अजूनही तुटलेला आहे. रस्ते पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, पुणे घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदुरबार, नाशिक घाट, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुबई उपनगर, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येथील पुराची परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
मच्छिमारांना सतर्क राहण्याच्या सूचना
मुंबई : भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रातर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांला २१ ऑगस्टच्या दुपारी २.३० पर्यंत ३.४ ते ४.४ मीटर तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्याला २१ ऑगस्टच्या दुपारी २.३० पर्यंत २.९ ते ४.० मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पथकांनी विविध जिल्ह्यांत नागरिकांना पुरातून सुखरूप बाहेर काढले. पालघरमधून ७० जणांना सुरक्षित स्थळी नेले.
ओला दुष्काळ जाहीर करा : सपकाळ
राज्यात १५ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीने मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
पोल्ट्रीत पाणी; ४२०० पिलांचा मृत्यू
बोरवडे (जि. कोल्हापूर) : धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे दूधगंगा नदीला पूर आला असून, पुराचे पाणी पोल्ट्रीत शिरल्याने ४२०० कुक्कुट पिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बिद्री (ता. कागल) येथे घडली. मध्यरात्रीच्या सुमारास नदीला आलेल्या महापुरामुळे नुकसान झाले आहे.
पूर ओसरल्यानंतर पंचनामे सुरू
- छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यात एक बंधारा वाहून गेला आहे.
- बीड : जिल्ह्यात शेतीसह घरांचे नुकसान, दोघांचा बळी, पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे.
- जालना : दोन हजार हेक्टरवरील पिके बाधित, नुकसानीचे पंचनामे सुरू.
- परभणी : दुधना नदी पात्रात वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे.
- नांदेड : पूर ओसरला असला तरी घरांमध्ये पाणी. पूरग्रस्त गावात बाधितांना मदतीचा हात.
- अमरावती : अमरावतीतील दोन मंडळात अतिवृष्टी/ यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्प ओव्हर फ्लो.
- पुणे : आळंदीत इंद्रायणीला महापुर; दोन पूल वाहतुकीसाठी बंद.
अनेक धरणे ओव्हरफ्लो
मुंबई : बुधवारी राज्यातील पावसाचा जोर ओसरला असून, राज्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या सर्वदूर पावसामुळे राज्यातील बहुतांशी जलसाठे ओव्हरफ्लो झाले आहेत. राज्यात १ जूनपासून २० ऑगस्टपर्यंत पडणाऱ्या सामान्य पावसापेक्षा ७% अधिक पाऊस झाला.दोन दिवसात १३८ मोठ्या धरणातील सरासरी पाणीसाठ्यात २.३० टक्के वाढ झाली असून, धरणे ९० टक्के भरली आहेत. त्यातून विसर्ग सुरू केल्याने पंचगंगा, कोयना, कृष्णा, गोदावरी, चंद्रभागा, नीरा, प्रवरा, गिरणा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गतवर्षाच्या तुलनेत नागपूर विभागात अद्याप जलसाठ्यांमध्ये १०% कमतरता आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाणी सोडण्यात आल्याने ६ हजार ३४० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरीत करण्यात आला. गाेदावरीला पूर आला आहे. पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, पवना, नीरा नद्यांना पूर आल्याने उजनी धरणातून भीमा नदीत दीड लाख क्यूसेकचा विसर्ग सोडण्यात आल्याने पंढरपुरातील दोन पूल पाण्याखाली गेले.
विभागनिहाय जलसाठा
विभाग माेठी धरणे जलसाठा
- नागपूर १६ ६७%
- नाशिक २२ ८३%
- अमरावती १० ८५%
- छ. संभाजीनगर ४४ ८९%
- पुणे ३५ ९५%
- कोकण ११ ९५%
- बीड जिल्ह्यात पावसाने दोघांचा बळी घेतला असून परभणीत दोघेजण दुधना नदी पात्रात वाहून गेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात नाल्यात वाहून गेलेल्या शिक्षकाचा मृतदेह भामरागडात आढळला.
- उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण बुधवारी पहाटे भरले. धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवारी २० हजार ७६३ क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात आला.
गोदावरीला पूर, प्रकल्पांमधून विसर्ग
नाशिकमध्ये घाटमाथ्यासह प्रदेशात बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गाेदावरीला सायंकाळी पूर आला. विविध प्रकल्पामधून नदीपात्रात विसर्ग होत आहे. कोयनातून विसर्ग, नद्या पात्राबाहेर
सातारा जिल्ह्यात पावसाचे रौद्ररूप सुरूच आहे. कोयनेसह प्रमुख धरणांतून सुमारे दीड लाख क्युसेक विसर्ग सुरू असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर जाऊ लागले आहे.
पंचगंगा धोका पातळीकडे
कोल्हापूर : धरणातील विसर्ग कायम असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीने इशारा (३९ फूट) पातळी ओलांडून धोका पातळी (४३ फूट) आगेकूच सुरू केल्याने कोल्हापूरकरांच्या पोटात भीतीचा गोळा आला.
जगबुडी धोका पातळीवरच
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने बुधवारी सकाळपासून थोडी उसंत घेण्यास सुरुवात केल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये निर्माण झालेली पूरस्थिती ओसरण्यास मदत झाली. मात्र, जगबुडी नदी अजूनही धोका पातळीवर आहे.
भीमा नदीत दीड लाख क्युसेकचा विसर्ग
पंढरपूर : उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी उजनी, वीर धरणातून विसर्ग सोडल्याने चंद्रभागा नदीच्या पात्रातील मंदिराभोवती पाणी वाढू लागले.
कृष्णा नदीची पातळी ३८ फुटांवर
सांगली जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे. धरणांमधील विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी बुधवारी दुपारी ३८ फुटांवर गेली होती.