Rain Updates: ठाणे, रायगडसह कोकणात आजही मुसळधार; हवामान खात्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 10:18 IST2021-07-25T10:17:44+5:302021-07-25T10:18:17+5:30
गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे.

Rain Updates: ठाणे, रायगडसह कोकणात आजही मुसळधार; हवामान खात्याचा इशारा
मुंबई : मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी कोकणातील उर्वरित जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम आहे. रविवारीदेखील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा आता कर्नाटक किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत गेला आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
२५ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. २६ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. २७ आणि २८ जुलै रोजीदेखील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात सर्वसाधारण वरीलप्रमाणे वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.