पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 07:59 IST2022-09-12T07:58:15+5:302022-09-12T07:59:33+5:30
बंगालच्या उपसागरात निर्माण झाले कमी दाबाचे क्षेत्र

पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट
मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भासह मराठवाड्यावर पुन्हा एकदा पावसाचे ढग जमा झाले असून, या प्रदेशांसह लगतच्या परिसरांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे, तर कोकणातही पावसाचा जोर वाढणार असून, १२ सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांना, तर १३ सप्टेंबरला रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
१२ आणि १३ सप्टेंबरला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्रात घाट भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल आणि बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १५ सप्टेंबरपर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून, किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील.
दरम्यान, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोवा आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
पुढील चार ते पाच दिवस मान्सून राज्यात सक्रिय राहील. राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, हवामान खाते