राज्यातही मुसळधार; वीज पडून तिघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 02:44 AM2019-06-30T02:44:47+5:302019-06-30T02:45:07+5:30

मुंबईमध्ये शुक्रवारी रात्रभर आणि शनिवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या.

rain in the state also three killed | राज्यातही मुसळधार; वीज पडून तिघे ठार

राज्यातही मुसळधार; वीज पडून तिघे ठार

googlenewsNext

मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस कोसळल्याने बळीराजा सुखावला. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, विदर्भ, मराठवाडा मुसळधार पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

मुंबईमध्ये शुक्रवारी रात्रभर आणि शनिवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. ठाणे, पालघर आणि पनवेलसह रायगड जिल्ह्यालाही पावसाने दणका दिला. पावसामुळे वसईत तानसा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही शनिवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले. रत्नागिरीत शीळ धरण पाण्याने पूर्ण ओसंडून वाहू लागले आहे.

प. महाराष्ट्रात पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होत आहे. भोगावती नदी काठोकाठ भरून वाहू लागली असून, पंचगंगेची पातळी दोन दिवसांत सात फुटांनी उचलली आहे. सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, महाबळेश्वर, नवजा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे.

कोयना धरणात ११ हजार ३०१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पावसामुळे जिल्ह्याच्या महाबळेश्वर, पाटण, कोयनानगर, कास, बामणोली भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घाटघर येथे दोन दिवसांत ११५ मिलीमीटर पाऊस झाला.
मराठवाड्यात गेल्या आठवडाभरापासून पाऊस होत असून औरंगाबाद, लातूर, परभणीत आजही पाऊस पडला.

अतिवृष्टीची नोंद
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विदर्भात काही
ठिकाणी मुसळधार तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बºयाच ठिकाणी पाऊस पडला.

Web Title: rain in the state also three killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.