Maharashtra Election 2019 : पावसामुळे उमेदवारांच्या छुप्या भेटींवर मर्यादा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 12:14 IST2019-10-20T11:55:29+5:302019-10-20T12:14:57+5:30
पावसामुळे नियोजनात असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवारांना कठिण झाले आहे. अशा मतदारांना न भेटता निवडणुकीला सामोरे जाताना उमेदवारांच्या मनातील धाकधुक वाढत आहे. एकंदरीत पावसामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

Maharashtra Election 2019 : पावसामुळे उमेदवारांच्या छुप्या भेटींवर मर्यादा !
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. त्याचवेळी राज्यभरात पावसांने जोर धरला आहे. उद्या मतदान असून मतदानावर देखील पावसाचे सावट आहे. त्यामुळे मतांच्या टक्केवारीत घट येण्याची शक्यता आहे. आपल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवारांना कष्ट घ्यावे लागणार आहे. तर पावसामुळे उमेदवारांच्या छुप्या भेटीगाठींवर मर्यादा आल्या आहेत.
शनिवारी सकाळपासूनच महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. तर अनेक ठिकाणी शुक्रवारी देखील मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी साताऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असताना केलेली सभा चर्चाचा विषय ठरली होती. त्यानंतर अनेक नेत्यांनी पावसाची तमा न बाळगता सभा घेतल्या.
दरम्यान पाऊस रविवारीही सुरू असल्याने अनेक नेत्यांचे नियोजन बिघडले आहे. प्रचार थंडावल्यानंतर छुप्या गावभेटी घेऊन मतदारांनी आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करण्याचे नियोजन नेत्यांनी केले होते. त्यासाठी कार्यक्रमही ठरला होता. परंतु, पावसामुळे या भेटींवर मर्यादा आल्या आहेत.
ग्रामीण भागात एखाद्या ठिकाणी छोटेखाणी बैठकींचे आयोजन करण्यात येते. यामध्ये नेते मतदारांना मतदानाचे आवाहन करत असतात. परंतु, पावसामुळे नियोजनात असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवारांना कठिण झाले आहे. अशा मतदारांना न भेटता निवडणुकीला सामोरे जाणे उमेदवारांच्या मनातील धाकधुक वाढवणारी बाब आहे. एकंदरीत पावसामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.