Rain Alert: मुंबईत पुढील पाच दिवस यलो अलर्ट; कोकणात मुसळधार कोसळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 17:15 IST2022-07-01T17:15:04+5:302022-07-01T17:15:47+5:30
पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आदेश देण्यात आले आहेत.

Rain Alert: मुंबईत पुढील पाच दिवस यलो अलर्ट; कोकणात मुसळधार कोसळणार
महिनाभराच्या विलंबाने महाराष्ट्रात पोहोचलेल्या पावसाने जोर पकडला आहे. मुंबईमध्ये पुढील पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पालघर, मुंबई, ठाणे, कोल्हापूरपर्यंत पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत बैठक होत आहे. यामध्ये अधिकाऱ्यांना खबरदारीचे आदेश देण्यात येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये पाऊस कोसळत आहे. काल पहिल्या दिवशी मुंबईतील नेहमीच्या ठिकाणी पाणी साचले होते. हिंदमाता चौक, अंधेरी, गांधी मार्केट आदी भागात पाणी साचले होते. रात्री उशिरा या पाण्याचा निचरा झाला.
राज्यात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मागील २४ तासांत कोकणात मुसळधार पाऊस झाला. सर्वाधिक मुंबईत १२६ मि.मी., तर रत्नागिरीत ८३ मि.मी. पाऊस झाला. सांताक्रूझ, अलिबाग येथे ५३ मि.मी. तर डहाणूत २१ मि.मी. पाऊस झाला. विदर्भातील अमरावतीत १५, वर्धा १४, बुलडाणा ६, नागपूर ४, ब्रह्मपुरी, चंद्रपूर १ तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये ९, महाबळेश्वर ८, सांगली ५ मि.मी. पाऊस पडला. कोकण वगळता उर्वरित भागात येत्या चार दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.