रेल्वेने ठेवला मृत कामगारांवरच ठपका; समितीचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 03:20 AM2020-10-10T03:20:41+5:302020-10-10T06:58:10+5:30

जालन्याजवळ रुळावर झोपलेल्या १३ जणांचा झाला होता मृत्यू

Railways blames dead workers for the accident in lockdown | रेल्वेने ठेवला मृत कामगारांवरच ठपका; समितीचा निष्कर्ष

रेल्वेने ठेवला मृत कामगारांवरच ठपका; समितीचा निष्कर्ष

Next

- शिवराज बिचेवार 

नांदेड : लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडल्याने गावाकडे जात असताना बदनापूरजवळ पहाटे रुळावर झोपलेल्या १३ कामगारांना रेल्वेने चिरडल्याची घटना ८ मे रोजी घडली होती. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने या अपघाताचा ठपका कामगारांवरच ठेवला आहे. स्वत:च्या मृत्यूस त्यांचाच नष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.

जालना येथील दोन कंपन्यांमध्ये परप्रांतीय मजूर होते. या मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कंपनीने केली होती. परंतु त्यानंतरही हे कामगार गावी परतण्याच्या ओढीने ७ मे रोजी पायीच जालना येथून निघाले. रस्त्यातील चेक पोस्ट आणि पोलिसांची नजर चुकविण्यासाठी त्यांनी रेल्वे रुळावरूनच चालण्याचा निर्णय घेतला होता. पायी चालून हे सर्व पहाटे बदनापूरजवळ पोहोचले. थकल्याने त्यांनी रुळावरच पाठ टेकविली.

गाढ झोपेमुळे रेल्वेचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. रेल्वे अंगावरून गेल्याने १३ जणांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे.
या समितीचे अध्यक्ष उपविभागीय दंडाधिकारी केशव नेटके होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के. व्ही. खरात आणि सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड हेही समितीत होते.

मयत कामगारांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान
मयत कामगारांच्या वारसांना शासनाने पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाने मानवीय दृष्टिकोनातून या कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे ठरविले असल्याचेही त्यात नमूद आहे.

समितीने दिलेला अहवाल
कामगारांची व्यवस्थापनाने जेवणाची, राहण्याची सोय केली होती. तसेच मूळ गावी जाण्यासाठी कामगारांनी बस, रेल्वेची व्यवस्था यासाठी कुठलाही ऑनलाईन परवाना काढला नव्हता. प्रशासनाची परवानगी घेतली नाही, तसेच कंपनी व्यवस्थापन, ठेकेदार यांना कोणतीही माहिती न देता किंबहुना प्रशासनाची नजर चुकवून रुळावरून चालत गेले. रुळावर झोपणे या कृतीस कामगारच जबाबदार आहेत.

Web Title: Railways blames dead workers for the accident in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.