रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेनेत धुसफूस कायम; तिन्ही आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 14:38 IST2020-01-15T14:38:21+5:302020-01-15T14:38:53+5:30
ज्या पक्षाचे आमदार अधिक त्यांचा पालकमंत्री हा शब्द अजित पवारांनी पाळावा, अशी मागणी गोगावले यांनी केली आहे.

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेनेत धुसफूस कायम; तिन्ही आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला
मुंबई - रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्यामुळे शिवसेनेते नाराजी आहे. राष्ट्रवादीकडून रायगडच्या पालकमंत्रीपदी खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र यावरून शिवसेनेतील नाराजी आता शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील नाराज तिन्ही आमदार आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले आहे.
पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या झाल्यापासूनच रायगडच्या पालकमंत्रीपदावरून जिल्ह्यातील शिवसेनेत नाराजी आहे. या नाराजीमुळे स्थानिक नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी राजीनाम्याचे अस्त्र उगरले होते. ही नाराजी कमी झाली असं चित्र होतं. मात्र जिल्हा शिवसेनेतील धुसपूस अजुनही कायम असून नेत्यांनी पक्षप्रमुखांची भेट घेऊन पालकमंत्रीपदासंदर्भात निर्णय घ्यावा यासाठी आमदार मंत्रालयात दाखल झाले आहे.
शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे हे पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत पोहोचले. ज्या पक्षाचे आमदार अधिक त्यांचा पालकमंत्री हा शब्द अजित पवारांनी पाळावा, अशी मागणी गोगावले यांनी केली आहे. रायगडमध्ये शिवसेनेचे तीन तर राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. जनतेच्या मनात देखील शिवसेनाचा पालकमंत्री व्हावा, असंच आहे. आमचे म्हणणे आम्ही पक्षप्रमुखांसमोर ठेवणार असल्याचे गोगावले सांगितले.