राहुल गांधी यांची आज महाडमध्ये सभा
By Admin | Updated: October 8, 2014 04:23 IST2014-10-08T04:23:22+5:302014-10-08T04:23:22+5:30
महाड मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची सभा बुधवारी महाड येथे होणार आहे

राहुल गांधी यांची आज महाडमध्ये सभा
महाड : महाड मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची सभा बुधवारी महाड येथे होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात राहुल गांधी यांची ही पहिलीच जाहीर सभा असेल. गांधी यांच्या या दौऱ्यामुळे रायगड जिल्ह्यातील
काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
चांदे क्रीडांगणावर दुपारी १२ वाजता होणाऱ्या या प्रचारसभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश आदी काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत असून चांदे क्रीडांगणावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या मतदार संघात काँग्रेसतर्फे निवडणूक लढवित असलेले माणिक जगताप हे राहुल ब्रिगेडमधील महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. या सभेला ५० हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सभेच्या ठिकाणाची तसेच परिसराची तपासणी केंद्रीय सुरक्षा पथकासह राज्य पोलिसांच्या विरष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकात महावरकर हे गेल्या दोन दिवसापासून महाडमध्ये तळ ठोकून सुरक्षिततेची काळजी घेत आहेत.