राहुल गांधी कधीच नेतृत्व करु शकत नाहीत, त्यासाठी मोदींसारखं...; बावनकुळेंनी सांगितला फरक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 11:04 IST2022-12-08T11:04:03+5:302022-12-08T11:04:47+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळत असल्याचं चित्र आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा १५० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे.

राहुल गांधी कधीच नेतृत्व करु शकत नाहीत, त्यासाठी मोदींसारखं...; बावनकुळेंनी सांगितला फरक!
नागपूर-
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळत असल्याचं चित्र आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा १५० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. भाजपाच्या या यशावर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आनंद व्यक्त करत गुजरातच्या जनतेचे आभार व्यक्त केले. तसंच गुजरातचा निकाल संपूर्ण देशासाठी महत्वाचा असल्याचं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संघटनात्मक कौशल्याचा हा विजय असल्याचंही ते म्हणाले. बावनकुळे यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला.
"गुजरातमध्ये काँग्रेसची धूळधाण उडाली आहे. मी याआधीही सांगितलं होतं राहुल गांधी कधीच नेतृत्व करू शकत नाहीत. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस कधीच जिंकू शकत नाही. त्यासाठी मोदींसारखं स्वत:ला देशाला समर्पित करावं लागतं. पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासासाठी स्वत:ला देशाला समर्पित केलं आहे", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
गुजरातचा निकाल ऐतिहासिक आणि विरोधकांचे डोळ उघडणारा
"गुजरातच्या जनतेनं मोदींवरचा विश्वास कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. इतकंच नाही, तर यावेळीचं यश गुजरात निवडणुकीच्या इतिहासातील सर्वात मोठं यश ठरताना दिसत आहे. जगात भारताला महाशक्तीशाली बनवण्याच्या मोदींच्या प्रयत्नांचं हे यश आहे. गुजरातमध्ये भाजपानं केलेल्या कामांना जनतेनं दिलेली ही पावती आहे. आता तरी या निकालातून विरोधकांचे डोळे उघडतील", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.