मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 19:11 IST2025-09-18T19:11:15+5:302025-09-18T19:11:50+5:30
Deputy CM Eknath Shinde: राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
Deputy CM Eknath Shinde: अशा प्रकारे कोणी सांगून मते कमी किंवा जास्त होत नसतात. जेव्हा काँग्रेस जिंकते तेव्हा त्यांचे आरोप नसतात. मात्र, जेव्हा काँग्रेसचा पराभव होतो तेव्हा ते आरोप करतात. ईव्हीएमवरही राहुल गांधी आरोप करतात. मात्र, ईव्हीएमवरील मतदानाला कधी आणि कोणाच्या काळात सुरूवात झाली, अशी विचारणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतचोरीबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. मतदार यादीतून काही व्यक्तींची नावे वगळण्यासाठी त्यांच्या ओळखीचा वापर दुसऱ्याच व्यक्तींनी केल्याचा दावा करत राज्याबाहेरचे काही मोबाईल क्रमांक ओटीपीसाठी वापरला गेला. २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत वोट चोरी झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. यावर आता राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले जात आहे.
न्यायालयात गेले पाहिजे
पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्या ठिकाणी मतचोरीचा आरोप केला, तेथे काँग्रेसचा उमेदवार निवडून कसा आला? राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे पुरावे दिले नाहीत. फक्त काही आकडेवारी सांगून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. पण जर राहुल गांधींकडे ठोस पुरावे असतील तर निवडणूक आयोगाकडे दिले पाहिजेत. तसेच त्यांनी न्यायालयात गेले पाहिजे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मनमोहन सिंग यांनी सुरू केलेली प्रक्रिया चुकीची होती का?
ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान घेण्याची पद्धत ही यूपीएच्या काळात सुरू झाली. त्यावेळी मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. त्यामुळे त्यांनी सुरू केलेली प्रक्रिया ही चुकीची आहे, असे त्यांना म्हणायचे आहे का? मतचोरी करण्याचे काम १४ ते १५ वर्षांपासून सुरू आहे, असे ते सांगत आहेत का? आता १५ वर्षांपूर्वी सत्तेत कोण होते? असा सवाल शिंदे यांनी केला.
दरम्यान, निवडणूक आयोगाने राहुल गांधी आणि जे आरोप करतात त्यांना सांगितले होते की, तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते सादर करा. तसेच प्रतिज्ञापत्र सादर करा. मात्र, प्रतिज्ञापत्र न देता फक्त आरोप करत आहेत. मी काही वेळापूर्वी पाहिले की, कर्नाटकमधील एका मतदारसंघामध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, जर मतांची चोरी झाली असती तर त्या ठिकाणी काँग्रेसचा आमदार निवडून कसा आला? मग मतांची चोरी कोणी केली? भाजपाने केली की काँग्रेसने केली? अशी विचारणा एकनाथ शिंदे यांनी केली.