अभिमानस्पद! महाराष्ट्राच्या बीजमाता राहीबाई पोपरे, पोपटराव पवार यांना पद्मश्री जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 22:20 IST2020-01-25T19:57:17+5:302020-01-25T22:20:34+5:30

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

rahibai popere and popatrao pawar honoured by padma shri award | अभिमानस्पद! महाराष्ट्राच्या बीजमाता राहीबाई पोपरे, पोपटराव पवार यांना पद्मश्री जाहीर

अभिमानस्पद! महाराष्ट्राच्या बीजमाता राहीबाई पोपरे, पोपटराव पवार यांना पद्मश्री जाहीर

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या बीजमाता राहीबाई पोपरे आणि अहमदनगरच्या आदर्श  गाव हिवरेबाजाराचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

सीड मदर म्हणून राहीबाई पोपरे यांना ओळखले जाते. हायब्रीड वाण आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्या वाढल्याने विषमुक्त शेतीसाठी कृतिशील प्रयत्न राहीबाई करतात. शैक्षणिकदृष्ट्या निरक्षर असलेल्या राहीबाई ज्ञानाने खूप समृद्ध आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांना एका कार्यक्रमात राहीबाई पोपरेंचा उल्लेख मदर ऑफ सीड असा केला होता. 

गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून संकलित करणे,  इतरांना पेरणीसाठी प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे अशा पद्धतीने त्यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे. आतापर्यंत ५४ पिकांच्या ११६ वाणांच्या गावरान बियांचे जतन राहीबाईंनी केले आहे. 

आईच्या ममतेने दुर्मिळ पारंपरिक गावरान वाणांच्या बियाणांचे जतन करुन त्याची ‘बियाणे बँक ’ बनविणाऱ्या राहीबाई तालुक्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्या तमाम शेतकऱ्यांमध्ये ‘राहीमावशी’ नावाने परिचित आहेत. राहीबाईंनी आपल्या राहत्या घरात कोंभाळणेसारख्या छोट्या खेडे गावात पारंपरिक गावरान वाणांची बियाणे बँक ‘बायफ’ या सेवाभावी संस्थेच्या मदतीने सुरू केलेली आहे. या बँकेतून त्यांनी आत्तापर्यंत हजारो गरजू होतकरू शेतकऱ्यांना गावरान देशी वाणांचा पुरवठा केलेला आहे. गावरान बियाणे संवर्धन प्रचार व प्रसार यामध्ये केलेल्या भरीव कार्यासाठी राहीबाईंना 'लोकमत’ समूहानेदेखील सन्मानित केले होते.

अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. खरीप व रब्बी पिकांसाठी तसेच ग्रामस्थांच्या पिण्यासाठीची वार्षिक गरज तसेच पाळीव जनावरांना पिण्यासाठीची गरज लक्षात घेऊन यंदाच्या पावसाळ्यात गावात पडलेल्या पाण्याचे नियोजन  पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.

हरियाणा राज्यातील प्रशासकीय अधिकारी व विकास सेवेतील २६ जणांच्या पथकाने देखील आदर्शगाव हिवरे बाजारला भेट दिली होती. गावातील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे आदर्श असल्याचे मत हरियाणा राज्याचे सचिव डॉ. राजेश खोत यांनी व्यक्त होते. 
 

Web Title: rahibai popere and popatrao pawar honoured by padma shri award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.