The question of farmers' in the Lok Sabha naveen rane, Amol Kolhe, imtiyaz jaleel | शेतकरीप्रश्नी लोकसभेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज !
शेतकरीप्रश्नी लोकसभेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज !

मुंबई - लोकसभा निवडणुकीत देशात राष्ट्रवादाचा मुद्दा चांगलाच गाजला. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील बिघडलेले संबंध निवडणुकीच्या केंद्रस्थानी होते. या निवडणुकीत शेतकरी प्रश्नांवर फारसा कुणी जोर दिला नाही. परंतु, लोकसभेत शेतकरी प्रश्न सध्या गाजत आहेत.

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार महाराष्ट्रातील शेतकरी समस्या लोकसभेत मांडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, नवनीत राणा आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत शेतकरी समस्यांवर जोर दिला. त्यामुळे या तिन्ही खासदारांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची रणनिती वापरावी अशी मागणी केली. शेतकरी आत्महत्या, बैलगाडा शर्यती, ग्रामीण पर्यटन या प्रश्नांवरुन आकडेवारी मांडत सरकारच्या शेतकरी धोरणांसंदर्भात कोल्हे यांनी प्रश्न उपस्थित केले. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका असं, शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं. शेतकऱ्यांसंदर्भात सरकारकडून आम्हाला तशीच अपेक्षा असल्याचे कोल्हे यांनी म्हटले होते.

खासदार नवनीत राणा यांनी देखील शेतकरी आत्महत्येवर आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणींचा पाढाच वाचून दाखवला. यंदाही राज्यात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाची योग्य किंमत मिळत नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून डायरेक्ट खरेदी करावी, यासाठी आपण आदेश द्यावेत, अशी मागणी राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली. तसेच शेतकऱ्यांच्या मुलांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आज शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाच्या समस्या निर्माण होत आहे. शेतकरी म्हटलं की, स्थळ येत नाहीत. शेतकऱ्याच्या घरी आपल्या मुलीला दोन वेळचं जेवन मिळणार नाही, असा विचार मुलींकडचे करत आहेत. ही परिस्थिती भीषण असल्याचे नवनीत राणा यांनी नमूद केले.

खासदार इम्तियाज जलील यांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा लोकसभेत मांडला. त्यांनी मागील तीन वर्षातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी मांडली. यावेळी त्यांनी पत्रकारितेतील शेतकरी आत्महत्येसंदर्भातील आपले अनुभव सांगितले. पूर्वी शेतकरी आत्महत्या झाली की, आम्हाला धावत जावून माहिती घ्यावी लागत होती. पहिल्या पानावर बातमी यायची. परंतु, शेतकरी आत्महत्या एवढ्या नित्याच्या झाल्या की, आता त्याच्या बातम्या येणेही बंद झाले. मागील तीन महिन्यातच ८०० आत्महत्या झाल्याचे त्यांनी नमूद केले.

एकूणच तीनही नवनिर्वाचित खासदारांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावर या तिन्ही खासदारांचे कौतुक होत आहे.


Web Title: The question of farmers' in the Lok Sabha naveen rane, Amol Kolhe, imtiyaz jaleel
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.