Pushpak Express Accident Marathi: जिथे आईचा मृतदेह पडला होता, तिथे तो आला आणि त्याचं हातापायातील त्राणच गेलं. पटकन खाली बसत त्याने आईच्या कपड्याचे तुकडे हातात घेतले. ज्या छोट्या दगडांवर आईचे रक्त उडाले होते, ते दगड उचलले. पाण्याने धुतले आणि ते दगड छातीशी कवटाळत टाहो फोडला. अपघातात गमावलेल्या आईसाठी मुलाचा आक्रोश बघून उपस्थितांच्या काळजाची कालवाकालव झाली अन् सगळ्यांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कर्नाटक एक्स्प्रेसखाली चिरडलेल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. या घटनेत ११ वर्षाच्या एका मुलासह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातच होत्या ४३ वर्षीय कमला भंडारी. मूळच्या नेपाळच्या असलेल्या कमला भंडारी या मुंबईतील कुलाबा भागात राहतात.
आईचा अपघातातमृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा मुलगा तपेंद्र भंडारी याच्यावक मानसिक आघातच झाला. कारण त्यानेच आईला लखनौ रेल्वे स्थानकावरून पुष्पक एक्स्प्रेसमध्ये बसून दिलं होतं.
आईचा तो फोटो ठरला शेवटचा
पुष्पक एक्स्प्रेसने लखनौ रेल्वे स्थानक सोडण्यापूर्वी त्याने आईचा फोटो घेतला. आईचा शेवटचा फोटो ठरेल, असा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही. पण, काळाने डाव साधला अन् त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
कमला भंडारी यांचा मुलगा तपेंद्र आज (२३ जानेवारी) मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आला. अपघात झालेल्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचं अवसानच गळून गेलं. ज्या ठिकाणी त्याच्या आईचा मृतदेह पडलेला होता. त्याठिकाणी काही कपड्याचे तुकडे पडलेले होते. ते बघून त्याच्या अश्रूंचा बांध फुटला.
दगड कवटाळत धाय मोकलून रडला
तिथेच अनेक दगड-गोट्यांवर रक्त उडलेले होते. त्यातील काही दगड हातात घेऊन तपेंद्रने पाण्याने धुतले आणि छातीशी लावून तो धाय मोकलून तो रडत होता. कमला भंडारी या मूळच्या नेपाळच्या होत्या. त्यांचा मृतदेह परत नेण्यासाठी तपेंद्रने प्रशासनाला मदत करण्याची विनंती केली आहे.