पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 08:03 IST2025-09-26T08:01:35+5:302025-09-26T08:03:37+5:30
मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले.

पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. अनेकांची घरे बुडाली आहेत. दरम्यान, आता राज्य सरकारकडे मदतीची मागणी सुरू आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर आलेल्या भागात पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी बाधित शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सर्वतोपरी मदत केली जाईल,असे आश्वासन दिले. दरम्यान, आता मदतीवरून राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी सरकारला सवाल केले आहेत.
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
"मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये गेल्या ९०-९५ वर्षांत कधीही न पाहिलेली पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. महापूराची भीषणता भयंकर आहे. या महापुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतजमिनी खरडून गेल्या आहेत आणि गाळाने भरल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे बार्शी तालुक्यातील दहिटणे, म्हात्रीवाडी आणि नारी या गावांमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने आणि जगण्यासाठी पैशांची गरज असल्याने शेतकरी सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत. "आज पंजाब सारखं राज्य जर एका हेक्टरला पन्नास हजार रुपये आर्थिक मदत करत असेल एका हेक्टरला, तर मग महाराष्ट्रानं साडेआठ हजार रुपये का करावे?, असा सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला.
शेतकऱ्यांना मदत मागणे यात राजकारण आहे का?
"सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, परंतु आता मुख्यमंत्री महोदयांनी 'योग्य वेळी देऊ' असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोणतीही निवडणूक नसताना कर्जमाफी दिली होती, शासनाकडे पैसे नसतील तर कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली. शेतकऱ्यांना मदत मागणे यात राजकारण आहे का?, असा सवालही त्यांनी केला.