पुणेरी मिसळ - एक महान (ना)राजीनामा नाट्य आणि ' नामंजूर '
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 12:01 IST2019-09-30T11:58:53+5:302019-09-30T12:01:11+5:30
काही तास रंगलेल्या (ना)राजीनामा नाट्यात सस्पेन्स होता, हाय होल्टेज ड्रामा होता, नात्या-गोत्याचा भावूक फॅमिली इलेमेंट होता...

पुणेरी मिसळ - एक महान (ना)राजीनामा नाट्य आणि ' नामंजूर '
इये मराठीचिये नगरी एक महान (ना)राजीनामा नाट्य रंगले. काही तास रंगलेल्या या नाटकात सस्पेन्स होता, हाय होल्टेज ड्रामा होता, नात्या-गोत्याचा भावूक फॅमिली इलेमेंट होता. अखेर २४ तासांनंतर नाटकाच्या नायकाने एंट्री केली आणि त्याच्या स्वगतानंतर पडदा पडला. ते ऐकताना आम्हाला कविवर्य संदीप खरेंच्या ‘नामंजूर’ या गाजलेल्या आशयगर्भ सुंदर मराठी कव्वालीचीच आठवण झाली... त्यांची माफी मागून आम्ही ही कव्वाली सादर करताहोत..
नामंजूर! नामंजूर! नामंजूर!
जपून पदाला आरोप सोसणे - नामंजूर
अन् शिक्षेची ती वाट पाहणे - नामंजूर
मी ठरवेन दिशा या जगण्याची
दुसऱ्याच्या तालावर डुलणे - नामंजूर
मला कुणाची साथ नको अन् कौल नको
मला असल्या आमदारकीची झूल नको
मुहूर्त ठरवतो मीच, ज्या क्षणी हो इच्छा
सगळ्यांना सांगत बसणे - नामंजूर!
काकांना झाला त्रास केवढा! कारण मी!
सत्तेसाठी डाव शत्रूंचे, तारण मी!
खासगी जगण्याचा झाला चक्काचूर
अब्रूचे धिंडवडे निघणे - नामंजूर!
मीडियाच्या अंगी असतात लाख कळा
गृहकलहाच्या अफवेने मज बसती झळा
रोखठोक घाव द्यावे अन् घ्यावे
काकांकडे नेणे गाºहाणे - नामंजूर!
मी आरोपांना शाप मानले नाही
प्रत्यारोप करताना पाप मानले नाही
विना पुरावे, कुणाचे नाव गोवले नाही
राजकारण असले मी अद्याप पाहिले नाही
नातीगोतीे... फसली गणिते! दूर बरी!
कसली तत्त्वे, टगेगिरी त्यांचीच खरी!
सत्तेसाठी डावपेच, सगळे मी समजे
पण काकांना यात गोवणे - नामंजूर!
- अभय नरहर जोशी-