लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव (रायगड) / कोळवण (पुणे) :दिघी-पुणे महामार्गावरील ताम्हिणी घाटात थार जीप ५०० फूट खोल दरीत कोसळून पुण्यातील सहा तरुणांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री घडलेल्या या दुर्घटनेचा पोलिसांनी ड्रोनद्वारे राबवलेल्या सर्च ऑपरेशनमधून गुरुवारी पर्दाफाश झाला. पुण्यातील कोपरे गावात राहणारे हे तरुण रात्री ११ वाजता कोकणात पर्यटनासाठी जात असताना एका अवघड वळणावर काळाने त्यांच्यावर झडप घातली. संपर्क होत नसल्याने पालकांनी पोलिसांत खबर दिल्यानंतर प्रकार उघडकीस आला.
ड्रोनद्वारे शोधमोहीम
पोलिसांनी शोध सुरू केला असता ताम्हिणी घाटातील एका अवघड वळणावर रस्त्याचे संरक्षक रेलिंग तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी परिसरात ड्रोनद्वारे शोधमोहीम राबवली असता दरीत कोसळलेली जीप आढळली.
अपघात कसा घडला?
ताम्हिणी घाटातल्या कोंडेथर गावानंतर येणाऱ्या अवघड वळणावर जीप थेट शेकडो फूट खोल दरीत कोसळली. जीपचा चक्काचूर झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सर्व मृतदेह काढले बाहेर
संध्याकाळी सातपर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. रात्री उशिरपर्यंत उर्वरित दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. प्रथम चव्हाण (२२), पुनित शेट्टी (२०), साहिल बोटे (२४), महादेव कोळी (१८), ओंकार कोळी (१८), शिवा माने (१९) अशी मृतांची नावे आहेत.
'मोमोज' विकून घेतली थार
साहिल हा गरिबीशी झुंज देऊन स्वतःची 'थार' घेणारा आणि पुण्यात ३-४ ठिकाणी 'मोमोज'चा व्यवसाय उभा करणारा मेहनती तरुण होता. आपल्या जिवलग मित्रांना घेऊन तो पहिल्यांदाच कोकण फिरायला निघाला होता.
Web Summary : Six Pune youths died after their jeep plunged 500 feet into Tamhini Ghat. The accident, discovered via drone search, occurred Monday night as they traveled to Kokan. One victim, Sahil, a hardworking momo seller, owned the jeep.
Web Summary : ताम्हिणी घाट में जीप 500 फीट गहरी खाई में गिरने से पुणे के छह युवकों की मौत हो गई। ड्रोन खोज के माध्यम से पता चला कि दुर्घटना सोमवार रात को हुई जब वे कोंकण जा रहे थे। एक पीड़ित, साहिल, एक मेहनती मोमो विक्रेता, जीप का मालिक था।