Pulwama Attack: शहिदांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून 50 लाखांची मदत जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 19:27 IST2019-02-15T19:24:33+5:302019-02-15T19:27:41+5:30
महाराष्ट्राच्या दोन जवानांना पुलवामात वीरमरण

Pulwama Attack: शहिदांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून 50 लाखांची मदत जाहीर
सांगली: पाकिस्तानकडून पुलवामात करण्यात आलेल्या दहशतवाही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. यावेळी राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. शहिदांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असेल. देशातील सव्वाशे कोटी जनता या कुटुंबांसोबत आहे, असंही ते यावेळी म्हणाले. ते सांगलीतल्या तासगावमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
आज सर्व भारतीयांच्या मनात प्रचंड राग आहे. पुलवामा दशहतवादी हल्ल्यामुळे सारेच उद्विग्न आहेत. या भ्याड हल्ल्याची निंदा करावी तितकी कमी आहे. आज संपूर्ण देश शहिदांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे. पाकिस्तान आगळीक करीत आहे आणि त्याला तितकंच चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रातील जे जवान या हल्ल्यात शहीद झाले, त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रूपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यांच्या कुटुंबीयांचं पुनर्वसनसुद्धा करण्यात येईल. देशातील सर्व 125 कोटी भारतीय त्यांच्यासोबत आहेत. आपण सारे एक आहोत आणि भारतमातेचे सुपूत्र आहोत. त्यामुळे जात, धर्म, पंथ या आधारावर आमच्यात मतभेद नसावेत. आम्ही सारे वसुधैव कुटुंबकमच्या मार्गावर चालणारे आहोत, असंही त्यांनी म्हटलं.
सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयांचं अनावरण केलं. केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले, राज्यातील मंत्री श्री चंद्रकांत पाटील, श्री सुभाष देशमुख यावेळी उपस्थित होते. 70 कोटी रूपयांची भूमिगत गटार योजना आणि 5 कोटी रूपयांच्या बहुद्देशीय रूग्णालयाच्या कामाचं भूमिपूजन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं. दिव्यांगजनांना विविध वस्तूंचं वाटप यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना चाव्यासुद्धा प्रदान करण्यात आल्या.