राज्यात सार्वजनिक बांधकामकडील १६ हजार कोटींची बिले थकीत, कंत्राटदारांचा काम बंदचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:00 IST2025-02-03T12:57:14+5:302025-02-03T13:00:50+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदारांचे ६३० कोटी

Public works bills worth Rs 16000 crore are pending in the state, contractors warn of work stoppage | राज्यात सार्वजनिक बांधकामकडील १६ हजार कोटींची बिले थकीत, कंत्राटदारांचा काम बंदचा इशारा

संग्रहित छाया

कोल्हापूर : राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची १६ हजार कोटी रुपयांची बिले थकली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ठेकेदारांचे ६३० कोटी प्रलंबित आहेत. आम्ही कर्जबाजारी झालो आहोत. अतिशय अडचणीत आलेल्या कंत्राटदारांना तातडीने बिले द्यावीत अन्यथा काम बंदचा इशारा महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह सर्व आमदार आणि खासदारांना निवेदने दिली व सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

गेल्या वर्षभरात ५०५४/०३/०४ लेखाशीर्षाखाली फक्त ८ हजार कोटी रुपयांची तरतूद असताना तब्बल ८५ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली. ३०५४’ नाबार्ड, एडीबी, सीआरएफ या योजनांसाठीही तरतूद अतिशय कमी केली आणि कामे मोठ्या प्रमाणावर मंजूर करण्यात आली आहेत. गेल्या वर्षभरात कंत्राटदारांच्या वाट्याला केवळ कामाच्या देयकापोटी अत्यल्प निधी १० ते १५ टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे कंत्राटदार अडचणीत आले आहेत. गेल्या सहा महिन्यांत एकही बिल मिळालेले नाही. त्यामुळे अवलंबून असणारे सर्वच जण अडचणीत आले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Public works bills worth Rs 16000 crore are pending in the state, contractors warn of work stoppage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.