पं. सुधाकर चव्हाण यांचा कुमार गंधर्व राष्ट्रीय सन्मानाने गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 08:39 IST2025-09-30T08:39:12+5:302025-09-30T08:39:29+5:30
ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सुधाकर चव्हाण यांना २१वा कुमार गंधर्व राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले.

पं. सुधाकर चव्हाण यांचा कुमार गंधर्व राष्ट्रीय सन्मानाने गौरव
मुंबई : ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सुधाकर चव्हाण यांना २१वा कुमार गंधर्व राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. बोरिवलीतील अटल स्मृती उद्यान हॉलमध्ये कॅप्टन मोहन नाईक यांच्या हस्ते चव्हाण यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. विद्या गौरी गोखले, कॅप्टन सी. एल. दुबे, डॉ. गुलाबचंद यादव आणि रविशंकर सिंह आदी उपस्थित होते. गंधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी आणि सामाजिक कार्यकर्ते एम. अनंत रमन यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला असिथा क्रमधारी आणि तृप्ती राजपरिया यांनी राग यमनमध्ये ‘अरी एरी आली पिया बिन...’ आणि ‘पायोजी मैंने राम रतन धन...’ या बंदिशी सादर केल्या. त्यानंतर पं. परमानंद यादव यांनी राग केदार आणि राग भूपालीमध्ये तराना सादर केला. त्यांनी कुमार गंधर्वांकडून शिकलेली ‘मोतियन माला तोड दई री...’ ही बंदिश तसेच ‘नईहरवा हमका न भावे...’ हे निर्गुणी भजन सादर केले. तबल्यावर गुरशांत सिंह, हार्मोनियमवर तन्मय मिस्त्री तर तानपुर्यावर अनुज शर्मा, स्नेहा गावस व सुमित राऊत यांनी त्यांना साथ केली.
पंडितजींनी जिंकली मने
पं. सुधाकर चव्हाण यांनी राग मारूविहागमध्ये मोठा ख्याल, छोटा ख्याल आणि ‘ज्ञानीयांचा राजा गुरू महाराव...’ हा अभंग सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. त्यांच्या साथीस तबल्यावर पं. विश्वास जाधव, हार्मोनियमवर गंगाधर तुकाराम शिंदे, मंजीऱ्यावर रघुनाथ राऊत तसेच शिष्य शिवानंद स्वामी आणि नामदेव शिंदे यांनी गायन सहयोग दिला.