‘वंदे भारत’प्रमाणे सर्व ट्रेनमध्ये सुरक्षा सूचना, माहिती द्या; रेल्वेला हायकोर्टाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 11:52 IST2026-03-27T11:50:48+5:302026-03-27T11:52:29+5:30

लोकल गाड्यांमध्ये काही स्थानकांवर गाडी थांबणार नाही, अशी माहिती दर्शवणारे फलक किंवा घोषणा असतात. मात्र, लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारचे फलक किंवा घोषणा प्लॅटफॉर्मवर दिसत नाहीत.

provide safety instructions and information in all trains like vande bharat express high court big advises to indian railways | ‘वंदे भारत’प्रमाणे सर्व ट्रेनमध्ये सुरक्षा सूचना, माहिती द्या; रेल्वेला हायकोर्टाचा सल्ला

‘वंदे भारत’प्रमाणे सर्व ट्रेनमध्ये सुरक्षा सूचना, माहिती द्या; रेल्वेला हायकोर्टाचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : 'वंदे भारत' गाड्यांप्रमाणे सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये सार्वजनिक सुरक्षा सूचना (अनाउन्समेंट) सुरू करण्याचा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेला दिला. गाडी कोणत्या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे, याची माहिती देण्यात यावी, असेही न्यायालयाने म्हटले.

प्रवाशांनी चालत्या गाडीत चढणे किंवा उतरणे टाळावे, असे न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने निकालात म्हटले आहे. जवळपास १० वर्षापूर्वी जळगाव रेल्वे स्थानकावर चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करताना जखमी झालेल्या एका व्यक्तीस न्यायालयाने ८० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

लोकल गाड्यांमध्ये काही स्थानकांवर गाडी थांबणार नाही, अशी माहिती दर्शवणारे फलक किंवा घोषणा असतात. मात्र, लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारचे फलक किंवा घोषणा प्लॅटफॉर्मवर दिसत नाहीत. अनेक प्रवासी या गाड्यांचा वापर कमी अंतराच्या प्रवासासाठीही करतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. 

गाडी कोणत्या स्थानकांवर थांबणार नाही, याबाबत कोणतीही घोषणा नसल्यास, अशा स्थानकांवर चढणाऱ्या किंवा उतरणाऱ्या प्रवाशांना दोष देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रवाशांनी चालत्या गाडीत चढणे किंवा उतरणे टाळावे. गाडी पुढील स्थानकावर थांबेपर्यंत प्रतीक्षा करावी आणि आवश्यक असल्यास दंड भरावा, असा सल्ला न्यायालयाने दिला.

... म्हणून एखादा जीव धोक्यात घालतो

आपल्याला उतरायचे आहे, त्या स्थानकावर ट्रेन थांबणार नाही, हे समजल्यावर त्या क्षणी एखादी व्यक्ती जीव धोक्यात घालणारा निर्णय घेऊ शकते, याची मला जाणीव आहे; पण अशा वेळी मानसिक संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. हे प्रवाशांच्या कुटुंबाच्या हितासाठी आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले. 'अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वंदे भारत गाड्यांप्रमाणे सर्व गाड्यांमध्ये सार्वजनिक घोषणा प्रणाली सुरू करावी,' असे न्यायालयाने सुचविले.

न्यायालयाचे निरीक्षण काय ?

रोहिदास कुमावत यांनी दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी सुरू होती. रेल्वे दावा न्यायाधिकरणाने त्यांचा भरपाईचा दावा फेटाळला होता. न्यायाधिकरणाने ही घटना अपघात नसून रोहिदास यांच्या चुकीमुळे ते जखमी झाल्याचे म्हटले होते. याचिकेनुसार, कुमावत हे मनमाड ते जळगावदरम्यान गुवाहाटी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. जळगाव स्थानकाजवळ गाडी येत असताना गर्दीमुळे त्यांचा हात निसटला आणि ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला व पायांना दुखापत झाली.

...तर दुखापत होणे स्वाभाविक

रोहिदास कुमावत हे प्रामाणिक प्रवासी होते आणि जळगाव हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे स्थानक असल्याने सर्व गाड्या तिथे थांबतात, असा त्यांचा समज होता. गाडी जळगावला थांबत नाही, हे लक्षात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला, तर दुखापत होणे स्वाभाविक आहे, असे म्हणत न्यायालयाने कुमावत यांना ८० हजार रुपयांची नुकसानभरपाई १२ आठवड्यांत देण्याचे रेल्वे प्रशासनाला आदेश दिले.

 

Web Title : उच्च न्यायालय ने सभी ट्रेनों में वंदे भारत जैसी सुरक्षा घोषणाओं का सुझाव दिया।

Web Summary : मुंबई उच्च न्यायालय ने रेलवे को वंदे भारत जैसी सुरक्षा घोषणाएँ सभी लंबी दूरी की ट्रेनों में लागू करने का सुझाव दिया, जिसमें स्टेशन की जानकारी भी शामिल है। चलती ट्रेन से उतरते समय घायल हुए यात्री को अदालत ने मुआवज़ा देने का आदेश दिया, यात्री सुरक्षा और जागरूकता पर ज़ोर दिया।

Web Title : High Court advises safety announcements like Vande Bharat in all trains.

Web Summary : Mumbai High Court advises railways to implement safety announcements like Vande Bharat in all long-distance trains, including station information. Court ordered compensation for a passenger injured while disembarking a moving train, emphasizing passenger safety and awareness.