सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 19:19 IST2025-09-26T19:18:58+5:302025-09-26T19:19:58+5:30
पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करावी, वडेट्टीवार यांची मागणी

सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
विदर्भातील सोयाबीन शेतकऱ्यावर एकामागून एक संकट येत आहेत. सोयाबीनच्या पिकाला हमीभाव मिळत नाही. तशातच येलो मोझॅक या रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीकदेखील उद्ध्वस्त झालेले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार मदत सरकारने करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बेलोना गावातील शेतात आज काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली. यावेळी सोयाबीन पिकावर येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळून आले. या रोगामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सुमारे ८० टक्के शेंगांमध्ये दाणे तयारच झालेले नाहीत, तर उरलेला दाणा अत्यंत बारीक असल्यामुळे शेतकऱ्यांना काढणीचा खर्चही परवडणारा नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.
या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पादनच येणार नाही. एकीकडे अतिवृष्टी, दुसरीकडे रोगाचा प्रादुर्भाव सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ मदत देणे आवश्यक आहे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव यवतमाळ, वाशिम, वर्धा , चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यात झाला आहे.यामुळे शेतकऱ्यांना एक क्विंटल देखील उत्पन्न मिळणार नाही, शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे नुकसाना होणार आहे याबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी कृषिमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.