सागरी महामार्ग : नेदरलँडचे पंतप्रधान रुटा व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करारमुंबई : मुंबईत उभारण्यात येणार असलेल्या सागरी मार्गासाठीचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नेदरलँडची मदत घेण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांत हा अहवाल तयार होण्याची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधीच्या द्विपक्षीय करारानंतर पत्रकारांना सांगितले. मुंबईतील पायाभूत सुविधांचा पर्यावरणपूरक विकास करण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, या करारान्वये मुंबईतील सागरी किनारा मार्ग आणि मेट्रो या प्रकल्पांमध्ये संयुक्त जोडणी करण्याबाबत राज्याला नेदरलँडकडून तांत्रिक सल्ला मिळेल. यासंदर्भातील नियोजनासाठी गेल्या महिन्यात दोन डच तंत्रज्ञांनी मुंबई महापालिका आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्याकडून माहिती घेतली. या करारामुळे मेट्रो तसेच समुद्रकिनारा मार्ग (कोस्टल रोड) यासारखे मोठे प्रकल्प नावीन्यपूर्ण पद्धतीने राबविणे शक्य होणार आहे.डच सरकारतर्फे येत्या काही दिवसांत आणखी दोन तज्ज्ञ व्यक्ती भेट देऊन स्थानिक प्रशासनाशी चर्चा करणार आहेत. जल व्यवस्थापनातील आणखी एक जलतज्ज्ञ हेन्क ओविन्क हेदेखील महाराष्ट्रात येणार आहेत. जल व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांचे आराखडे तयार करणे याबाबतीत प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई येथून काही तज्ज्ञ नेदरलँडला पाठविण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी) मार्क रुटा म्हणतात...- मुंबईला जागतिक दर्जाच्या उत्तम सुविधा देताना पर्यावरणाचे भान राखले जावे, यासाठी आपला देश सहकार्य करेल, असे नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटा यांनी सांगितले. पर्यावरणपूरक प्रगतीसाठी नेदरलँडची जगभर ख्याती आहे. - या करारामुळे मेट्रो तसेच समुद्रकिनारा मार्ग (कोस्टल रोड) यासारखे मोठे प्रकल्प नावीन्यपूर्ण पद्धतीने राबविणे शक्य होणार आहे. नेदरलँडचे परराष्ट्र व्यापार व विकास मंडळाच्या मंत्री लिलियना पॉल्यूमन, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित होते.
प्रकल्प अहवाल नेदरलँड देणार
By admin | Updated: June 7, 2015 01:43 IST