मनोहर कुंभेजकर,
मुंबई- २०१०-२०११ पासून दुसऱ्या शिफ्टमधील सुमारे ३ कोटी थकबाकी मिळावी या मागणीसाठी वांद्रे (पूर्व) शासकीय तंत्रनिकेतनातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी उद्या, ५ आॅगस्टपासून दुसऱ्या शिफ्टवर बेमुदत बहिष्कार टाकणार आहेत. त्यामुळे त्याची झळ येथील ९९० विद्यार्थ्यांना बसणार आहे. राज्यात एकूण १९ शासकीय तंत्रनिकेतन असून मुंबई वगळता उर्वरित १८ तंत्रनिकेतनांना दुसऱ्या पाळीतील आस्थापनांचा मोबदला मिळतो. येथील सुमारे ५५ राजपात्रित अधिकारी आणि ७५ सहाय्यक कर्मचारी हे दुसऱ्या पाळीतील अनुदानापासून वंचित आहेत. दरम्यान, बरेच अधिकारी व कर्मचारी निवृत्त झाले तर बरेच कर्मचारी ठाणे, रत्नागिरी, मालवण, नाशिक व इतरत्र बदलीमुळे स्थलांतरित झाले आहेत.या थकबाकी संदर्भात २०१५च्या विधानसभेच्या पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लेखी आदेश देऊनही शासनाने याबाबत काहीच निर्णय घेतलेला नसल्याचे स्थापत्य विभागाचे प्रमुख प्रा. राजेंद्रकुमार यांनी सांगितले. प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची सहनशीलता संपल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. सोलापूर तंत्रनिकेतनमधून आजच प्राचार्य म्हणून रुजू झालेल्या स्वाती देशपांडे यांनी याप्रकरणी लक्ष घालून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रा.बहाटे यांनी केली आहे.>तावडेंच्या आप्तेष्टांना होर्डिंगचे काम?गेल्यावर्षी याच मागणीसाठी प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी १८ दिवस अध्यापन बंद ठेवून विनोद तावडे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, मंत्रीमहोदयांचे लक्ष शासकीय तंत्रनिकेतन परिसरात आप्तेष्टांच्या वाईड स्पेस कंपनीला होर्डिंगचे काम मिळावे, याकडे लागले होते. त्यामुळे प्रश्न प्रलंबित राहिल्याचा आरोप प्रा. बऱ्हाटे यांनी केला. सध्या होर्डिंगचे हे प्रकरण दिंडोशी कोर्टात प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणी तावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते संपर्क होऊ शकला नाही.