मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 09:44 IST2025-05-12T09:43:41+5:302025-05-12T09:44:35+5:30

प्रियांका आणि योगेश्वर आबदरे या दोघा बहीण भावंडांना वयाच्या दहाव्या वर्षानंतर सेरेब्रल पाल्सी आजार जडला. हळूहळू या त्रासाचे रुपांतर भयंकर व्याधीत झाले.

Priyanka Abdare, a girl suffering from cerebral palsy, dies at the age of 27, her brother hopes for government help | मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास

मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास

छत्रपती संभाजीनगर - ताप येण्याचं निमित्त झाले अन् ८ दिवसांतच तिची तब्येत खालावली. सेरेब्रल पाल्सीने आधीच लुळे झालेले शरीर साथ देईनासे झाले. रुग्णालयाच्या बिलाचा फुगणारा आकडा पाहून आई वडिलांनी तिला घरी आणले. त्यानंतर एकाच दिवसांत तिने अखेरचा श्वास घेतला. मृत्यूने गाठण्यापूर्वी ती मला जगायचंय एवढंच म्हणत राहिली. प्रियांकाने सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत या जगाचा कायमचा निरोप घेतला पण तिचा सेरेब्रल पाल्सीग्रस्त भाऊ अजूनही सरकारकडे मदतीची आस लावून आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्या मुलाचे सेरेब्रल पाल्सीमुळे २०२२ मध्ये निधन झाले होते. त्यामुळे हा आजार अनेकांना माहिती झाला. प्रियांका आणि योगेश्वर आबदरे या दोघा बहीण भावंडांना वयाच्या दहाव्या वर्षानंतर सेरेब्रल पाल्सी आजार जडला. हळूहळू या त्रासाचे रुपांतर भयंकर व्याधीत झाले. आपली मुले बरी होतील या आशेपायी बाळासाहेब आणि नीता आबदरे दाम्पत्याने सर्व जमापुंजी खर्च केली. मात्र उपचार करुनही मुलांमध्ये फार परिणाम झाला नाही. मोलमजुरी करणाऱ्या आबदरे कुटुंबाला महागडे उपचार करणे शक्यच नव्हते. त्यांनी अनेकांकडे मदत मागितली. मुख्यमंत्र्‍यांपर्यंत पोहचायचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न अपुरे पडले. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वयाच्या २७ व्या वर्षी सेरेब्रल पाल्सीग्रस्त प्रियांका हे जग सोडून निघून गेली. ही दोन्ही मुले वयाच्या १० व्या वर्षापर्यंत सामान्य होती. मात्र त्यानंतर हातपाय वाकडे होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या ५-६ वर्ष उठत बसत दोघेही चालू शकत होते. पण नंतर जागेवरून उठणेही अवघड होऊन बसले. वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत, नंतर सरकारी, आयुर्वेदिक अशा प्रत्येक ठिकाणी लाखो रुपये घालवले परंतु फरक पडला नाही. 

सेरेब्रल पाल्सी आजाराची लक्षणे काय?

सेरेब्रल पाल्सी मेंदूतील आजारामुळे होणारा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे. यात स्नायूंच्या हालचाली आणि नियंत्रणावर परिणाम होतो. या विकाराने ग्रस्त व्यक्तीला चालणे, बसणे, बोलणे आणि इतर शारीरिक क्रिया करणे कठीण होते. 

राजकीय नेत्यांची सहानुभूती, पण...

या दोघा बहीण भावंडांना मदत करण्यासाठी हरिभाऊ बागडे, नंदकुमार घोडेले, नारायण कुचे यासह अनेक नेत्यांनी आजपर्यंत वेळोवेळी भेट देण्याची, फोटो काढण्याची तत्परता दाखवली. बागडेंनी या दोघांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्जही पाठवला होता. मात्र अजूनपर्यंत कुठलीही मदत त्यांना मिळालेली नाही. त्यांचे शेजारी अक्षय महाकाळ यांनी सांगितल्यानुसार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्याकडूनही मदतीसाठी प्रयत्न केले पण फार काही हाती लागले नाही. 

Web Title: Priyanka Abdare, a girl suffering from cerebral palsy, dies at the age of 27, her brother hopes for government help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.