नाशिक येथील एका खाजगी शाळेला बॉम्बेने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर एकच खळबळ माजली. मात्र, बॉम्ब शोधक पथकाने केलेल्या तपासणीत ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले.
पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर पोलीस स्टेशनला पहाटे २.४५ वाजता एका बनावट ईमेल आयडीवरून धमकीचा ईमेल प्राप्त झाला. या ईमेलमध्ये, नाशिक-केंब्रिज हायस्कूलच्या बाथरूममध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला. पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकासह घटनास्थळी पोहोचून तपासणी सुरू केली. तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने शाळा सुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, सायबर पोलीस बनावट ईमेल आयडी शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
अलीकडेच दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली, तेव्हा काहीही संशयास्पद आढळले नाही. ईमेलद्वारे दिलेल्या धमकीत न्यायाधीशांच्या खोलीत ३ बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला आणि शोध मोहीम राबविण्यात आली.