...खासगी विमान माघारी फिरले, तानाजी सावंतांच्या मुलाचं ‘बेपत्ता’नाट्य; काय घडला घटनाक्रम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 09:17 IST2025-02-11T09:16:50+5:302025-02-11T09:17:36+5:30
चार्टर्ड प्लेनने मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता, गोंधळानंतर परत आला

...खासगी विमान माघारी फिरले, तानाजी सावंतांच्या मुलाचं ‘बेपत्ता’नाट्य; काय घडला घटनाक्रम?
पुणे - शिंदेसेनेचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचा पुणे पोलिस कंट्रोल रूमला फोन आला अन् संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सावंत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस आयुक्त यांना फोन केल्याने पोलिस यंत्रणेवर दबाव निर्माण झाला. चार्टर्ड विमानाने सावंत यांचे चिरंजीव ऋषिराज सावंत बँकॉकला जात होते.
मात्र वडिलांच्या अपहरणाच्या संशयामुळे त्यांचे विमान पुण्याकडे फिरवावे लागले. अवघ्या ५ तासांत ऋषिराज परत आला. दिवसातून १५ ते २० फोन होतात. त्यात अचानक हा एअरपोर्टवर कशाला गेला? या विचाराने मी अस्वस्थ झालो होतो, असे सावंत म्हणाले.
इतरांचीही चौकशी होणार
ऋषीराज सावंत आणि त्यांचे दोन मित्र हे नेमके कोणत्या कारणासाठी बाहेर चालले होते? याची माहिती आम्ही जाणून घेणार आहोत. ही माहिती पुढील चौकशीत समोर येईल. ऋषीराज सावंतच्या बरोबरील व्यक्तींचीही चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
काय घडला घटनाक्रम?
सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास ऋषिराज सावंत हे एका स्विफ्ट कारमध्ये बसून विमानतळावर गेले होते. त्यानंतर अचानक ते बेपत्ता झाल्याची बातमी पसरली. तानाजी सावंत यांनी थेट पोलिस आयुक्तांचे कार्यालय गाठले. दरम्यान, कंट्रोल रूमला माहिती मिळाली की, तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतरी घेऊन गेले आहे. त्यानंतर यंत्रणा सतर्क झाली. माहिती घेतली असता ऋषिराज चार्टर्ड विमानाने बँकॉकला जात असल्याचे समोर आले. एटीसीकडून पायलटला विमान परत पुण्याला घेऊन येण्याबाबत सांगण्यात आले. रात्री नऊच्या सुमारास विमान पुन्हा लोहगाव विमानतळावर लँड झाले.
माजी मंत्र्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचा फोन सोमवारी दुपारी नियंत्रण कक्षाला आला. पुण्याहून ऋषिराज खासगी विमानाने गेल्याचे कळले. आम्ही विमानतळ प्रशासनाशी बोलून, काही तासांतच त्यांचे विमान लोहगाव विमानतळावर आणले. मित्रांची चौकशी केल्यानंतरच अधिक माहिती मिळेल.
रंजनकुमार शर्मा, सहपोलिस आयुक्त