गुजरातकडून धडे घेण्याची महाराष्ट्रावर नामुश्की - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 06:36 IST2018-12-25T06:35:41+5:302018-12-25T06:36:11+5:30

रोजगार, गुंतवणुकीबाबत राज्य सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचे आता केंद्र सरकारनेच मान्य केले आहे. उद्यमशील तरुणांना स्टार्टअप कंपन्यांच्या उभारणीसाठी ठोस मदत करण्याऐवजी पोकळ घोषणा आणि आश्वासने दिली.

 Prithviraj Chavan, Maharashtra, to take lessons from Gujarat | गुजरातकडून धडे घेण्याची महाराष्ट्रावर नामुश्की - पृथ्वीराज चव्हाण

गुजरातकडून धडे घेण्याची महाराष्ट्रावर नामुश्की - पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : रोजगार, गुंतवणुकीबाबत राज्य सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचे आता केंद्र सरकारनेच मान्य केले आहे. उद्यमशील तरुणांना स्टार्टअप कंपन्यांच्या उभारणीसाठी ठोस मदत करण्याऐवजी पोकळ घोषणा आणि आश्वासने दिली. केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार स्टार्टअप कंपन्यांच्या धोरण अंमलबजावणीबाबत देशातील विविध राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक पहिल्या १५ मध्येही नाही, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, महाराष्ट्राला स्टार्टअप कॅपिटल करू, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. गुंतवणुकीबाबतच्या अनेक फसव्या घोषणांप्रमाणे मुख्यमंत्र्यांची ही घोषणाही फसवी ठरली. खुद्द केंद्रानेचतसा अहवाल दिला. शिवाय, स्टार्टअप धोरण कसे राबवावे यासाठी प्रगत गुजरातकडून धडे घ्यावेत, असे निर्देशही केंद्राने महाराष्ट्राला दिले आहेत. राज्यांची कामगिरी मोजण्यासाठी ३८ निर्देशांक ठरविले होते. त्यातील १७ निर्देशांकात कोणतेच काम झाले नसल्यामुळे महाराष्ट्राने माहितीच पाठविली नाही. या अहवालात गुजरातला १०० गुण मिळाले तर, महाराष्ट्र मात्र तळाशी आहे. राज्यात फडणवीस सरकार आल्यापासून सातत्याने उद्योगाचा विकासदर घटत आहे. मागील चार वर्षांत राज्यातील एकूणच औद्योगिक धोरणात फक्त जाहिराती आणि मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र यांसारख्या इव्हेंटचा भरणा झाला. याचा परिणाम वाढत्या बेरोजगारीत दिसून येत आहे, असे चव्हाण म्हणाले.

Web Title:  Prithviraj Chavan, Maharashtra, to take lessons from Gujarat