पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्गमित्र हरिकृष्ण शहा यांचे अपघाती निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 22:13 IST
मोदींच्या आईकडून खाल्ला होता मार...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्गमित्र हरिकृष्ण शहा यांचे अपघाती निधन
ठळक मुद्देअकराव्या मजल्यावरील गच्चीतून पडले मगरीचे पिलू आणले म्हणनू मोदींबरोबर आईचा खाल्ला होता मार
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्गमित्र आणि पतंजली योगपीठाचे सदस्य हरिकृष्ण घनशामदास शहा (वय ६४) यांचे अकराव्या मजल्यावरील गच्चीतून पडून शनिवारी सायंकाळी दुर्दैवी निधन झाले...नरेंद्र मोदी यांच्या वडनगर येथील गावचे मुळ रहिवासी असलेले शहा हे त्यांचे वर्गमित्र होते. मोदींच्या पुस्तकातही त्यांचा उल्लेख आहे. शनिवारी सायंकाळी ते आपले मावसभाऊ सुरेश मेहता यांच्या गोखलेनगरमधील तपोवन येथील घरी कुटुंबियांसहित गेले होते. घरगुती कार्यक्रम संपल्यावर त्यांनी कुटुंबियांना प्राणायाम करून येतो असे सांगितले. त्यांचा गाडीचालक खाली वाट पाहत होता. सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास ते अचानक गच्चीतून खाली पडले. उंचावरून पाहिल्यावर चक्कर येणारा व्हर्टिगो हा विकार असल्याने हा अपघात घडल्याचा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, जास्त रक्तस्त्राव झालेला असल्याने त्यांचे उपचारापूर्वीच निधन झाले.नरेंद्र मोदी यांच्या वडनगर येथील घराजवळच शहा यांचे घर होते. एकाच शाळेत ते शिकत होते. त्यानंतर ते पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकण्यासाठी आले. रविवार पेठेतील भांडेआळी येथे त्यांचे जुने घर होते. त्यानंतर त्यांनी शेअर ब्रोकरचा व्यवसाय सुरू केला.सामाजिक जीवनातही ते सक्रीय होते. बाबा रामदेव यांच्या पंतजली योगपीठाचे ते विश्वस्त होते. रामदेव यांनी भ्रष्टाचाराविरोधात सुरू केलेल्या आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचेही ते जवळचे मित्र होते..
................
मोदींच्या आईकडून खाल्ला होता मार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळेत असताना मगरीचे पिलू पकडून आणले होते. घरी आल्यावर त्यांची आई रागावली. तुला जर कोणी आईपासून दूर केले तर कसे वाटेल, असे विचारून मोदी आणि त्यांच्याबरोबरील हरिकृष्ण यांना रट्टे लगावले होते.