गुन्हेगारी रोखायची असेल तर शिंदेंचा राजीनामा घ्या; गोळीबार करणाऱ्या भाजप आमदाराची मोदींकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 12:49 PM2024-02-03T12:49:09+5:302024-02-03T13:54:41+5:30

महाराष्ट्रात यापुढे गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी गणपत गायकवाड यांनी केली आहे.

Prime Minister Narendra Modi should ask Eknath Shinde to resign from the post of Chief Minister BJP MLA Ganpat Gaikwad demand | गुन्हेगारी रोखायची असेल तर शिंदेंचा राजीनामा घ्या; गोळीबार करणाऱ्या भाजप आमदाराची मोदींकडे मागणी

गुन्हेगारी रोखायची असेल तर शिंदेंचा राजीनामा घ्या; गोळीबार करणाऱ्या भाजप आमदाराची मोदींकडे मागणी

CM Eknath Shinde ( Marathi News ) : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड आणि अन्य एका व्यक्तीवर गोळीबार केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधीनेच कायदा हातात घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. मात्र मला या कृत्याचा कसलाही पश्चाताप नसल्याचं सांगत आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही आमदार गायकवाड यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांविरोधात हल्लाबोल करत गणपत गायकवाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे की, "एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवत आहेत. ते मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील. शिंदे यांनी आमच्यासारख्या चांगल्या माणसाला आज गुन्हेगार बनवलं आहे. मनस्ताप झाल्याने मी फायरिंग केली. या कृत्याचा मला काहीही पश्चाताप नाही. कारण माझ्यासमोर माझ्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये धक्काबुक्की करत असतील तर मी काय करणार? पोलिसांच्या धाडसामुळे महेश गायकवाड वाचला. पोलिसांनी धाडस करून मला पकडलं. मी महेश गायकवाडला जीवे मारणार नव्हतो. पण माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करावं लागलं."

"फडणवीस-मोदींनी राजीनामा घ्यावा"

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात गुन्हेगारी पोसली असून ही गुन्हेगारी संपवायची असेल तर त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे. "मला या कृत्याचा पश्चाताप नाही. मी एक व्यावसायिक आहे. माझ्या मुलासाठी मी हे सगळं केलंय आणि कोणी माझ्या मुलालाच मारत असेल तर मी हे सहन करू शकत नाही. एक बाप म्हणून मी हे केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि ते भाजपसोबतही गद्दारीच करणार आहेत. एकनाथ शिंदेंकडे माझे करोडो रुपये बाकी आहेत. ते जर देवाला मानत असतील तर त्यांनी शपथ घेऊन सांगावं की, गणपत गायकवाडचे माझ्याकडे किती पैसे बाकी आहेत. माझे एवढे पैसे खाऊनही ते माझ्याविरोधातच काम करत आहेत. याप्रकरणी आता कोर्ट जो निर्णय देईल ते मला मान्य असेल. महाराष्ट्रात यापुढे गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील. मात्र माझी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती असेल की शिंदेंचा राजीनामा घ्या," असं गायकवाड म्हणाले.

दरम्यान, "एकनाथ शिंदे यांनी सर्व महाराष्ट्रभर असे गुन्हेगार पाळून ठेवले आहेत. शिंदे यांनी दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलं आहे. मी याबाबत पक्षाच्या वरिष्ठांना वारंवार सांगितलं होतं. मी आमदार म्हणून निधी आणून काम केल्यानंतर श्रेय घेण्यासाठी जबरदस्तीने तिथे खासदार श्रीकांत शिंदे यांनी बोर्ड लावले आणि माझ्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप केले. एकनाथ शिंदे यांनी किती पैसे खाल्ले हे त्यांनी सांगावं," असा घणाघातही आमदार गणपत गायकवाडांनी केला.

कोणत्या कारणामुळे झाला वाद? गणपत गायकवाड म्हणाले...

शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासोबत झालेल्या वादाविषयी बोलताना गणपत गायकवाड म्हणाले की, "मी १० वर्षांपूर्वी एक जागा घेतली होती. जागामालकाला दोन-तीन वेळा पैसे दिले. पण नंतर तो सह्या करण्यासाठी येत नव्हता. त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो आणि ही केस आम्ही जिंकली. त्यानंतर सातबारा आमच्या कंपनीच्या नावावर झाला. मात्र तरीही महेश गायकवाड यांनी जबरदस्तीने त्या जागेवर कब्जा घेतला. मी त्यांना परवाही सांगितलं होतं की, तुम्ही कोर्टात जाऊन ऑर्डर आणा, जबरदस्तीने कब्जा घेऊ नका. पण त्यांनी तरीही दादागिरी करून कंपाऊंड तोडलं आणि जागेचा कब्जा घातला. आजही ४०० ते ५०० लोकं घेऊन महेश गायकवाड पोलीस स्टेशनला आला आणि त्याने माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या मुलाला धक्काबुक्की होत असताना मी शांतपणे पाहू शकत नव्हतो. त्यामुळे मी महेश गायकवाडवर गोळीबार केला," असा दावा आमदार गायकवाड यांनी केला आहे.
 

Web Title: Prime Minister Narendra Modi should ask Eknath Shinde to resign from the post of Chief Minister BJP MLA Ganpat Gaikwad demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.