Uddhav Thackeray: राज्यात मुलांच्या लसीकरणाच्या तयारीला लागा; उपाहारगृहे, दुकानांबाबत मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 05:56 PM2021-10-18T17:56:40+5:302021-10-18T18:39:11+5:30

Maharashtra Unlock in Process: कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

Prepare for corona Vaccination of children; Uddhav Thackeray orders on Restaurant, Shops timing in Task force meet | Uddhav Thackeray: राज्यात मुलांच्या लसीकरणाच्या तयारीला लागा; उपाहारगृहे, दुकानांबाबत मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश

Uddhav Thackeray: राज्यात मुलांच्या लसीकरणाच्या तयारीला लागा; उपाहारगृहे, दुकानांबाबत मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश

Next

मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्स मधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  होते. या वेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होतील. 

कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होतांना दिसते. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांची देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या. दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. 

कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, संचालक डॉ दिलीप म्हैसेकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर,  पालिका उपायुक्त सुरेश काकाणी, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ खुसराव्ह, डॉ अजित देसाई, डॉ सुहास प्रभू आदी उपस्थित होते. 

Web Title: Prepare for corona Vaccination of children; Uddhav Thackeray orders on Restaurant, Shops timing in Task force meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.