प्रीती राठी अ‍ॅसिड हल्लाप्रकरण : अंकुरला फाशी दया

By Admin | Updated: September 8, 2016 06:08 IST2016-09-08T06:08:52+5:302016-09-08T06:08:52+5:30

प्रीती राठी अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपी अंकुर पनवार याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विशेष महिला न्यायालयाकडे केली.

Preeti Rathi acid attack: Ankur is hanged | प्रीती राठी अ‍ॅसिड हल्लाप्रकरण : अंकुरला फाशी दया

प्रीती राठी अ‍ॅसिड हल्लाप्रकरण : अंकुरला फाशी दया

मुंबई : प्रीती राठी अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपी अंकुर पनवार याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विशेष महिला न्यायालयाकडे केली. या खटल्याचा निकाल गुरुवारी लागण्याची शक्यता आहे.
‘फाशीची शिक्षा ठोठावण्यास ही योग्य केस आहे. गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी व समाजाला सुरक्षित ठेवण्याकरिता, असे कृत्य करणाऱ्या गुन्हेगाराला कठोर शिक्षा ठोठावलीच पाहिजे. अन्यथा न्यायालय त्यांचे कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरेल. भारतात महिलांचा आदर केला जातो. महिलांना संरक्षण देण्याकरिता कायद्यातही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे समाजाला योग्य संदेश मिळावा, यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा ठोठवण्यात यावी,’ असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला.
‘प्रीती राठीला तिचा काहीही दोष नसताना एक महिना प्राणांतिक वेदना सहन कराव्या लागल्या. तिची दृष्टी गेली, स्वरयंत्र, फुप्फुसही निकामी झाले. एक महिना सतत तिच्या पोटातून रक्तस्त्राव होत होता. अखेरीस तिचा १ जून रोजी मृत्यू झाला. निष्पाप पीडितेला एवढ्या वेदना देणाऱ्या आरोपीला फाशीच्या शिक्षेशिवाय अन्य कोणतीही शिक्षा देऊ नये,’ असा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी केला.
तर दुसऱ्या बाजूला पनवारच्या वकील अपेक्षा वोरा यांनी पनवार याचे वय लक्षात घेऊन कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती न्यायालयाला केली. ‘सुरुवातीला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची उलटतपासणी घेण्यास असमर्थ होत, या साक्षीदारांची उलटतपासणी घेण्यासाठी तयारी करण्याकरिता पुरेसा वेळही देण्यात आला नाही. त्याशिवाय सरकारी वकिलांनी प्रीती राठी नौदलाच्या सेवेत लेफ्टनंट म्हणून रूजू होण्यासाठी मुंबईला आली होती,’ असा दावा केला, तरी तिचे मूळ नियुक्तीपत्र सादर करण्यात आले नाही. पनवारचे वय आणि घरातील एकुलता एक कमवता मुलगा असल्याने त्याला कमी शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती अ‍ॅड. वोरा यांनी न्यायालयाला केली. (प्रतिनिधी)

Web Title: Preeti Rathi acid attack: Ankur is hanged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.