उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून लोक आपल्या कुटुंबासह येत आहेत. याच दरम्यान बंद असलेल्या घरात चोरी झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. महाराष्ट्रातील नांदेडमधून चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड येथील एक व्यापारी कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह प्रयागराजमधील त्रिवेणी संगमच्या काठावर पोहोचले होते. त्यामुळे त्यांचं घर बंद होतं.
चोरांनी याचाच फायदा घेतला आणि १५ तोळं सोनं, दीड लाखांवर डल्ला मारला आहे. कुलूप तोडून घरामध्ये ठेवलेले दीड लाख आणि १० ते १५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण पाच ते सात लाखांचा ऐवज चोरून नेला. २३ फेब्रुवारीच्या रात्री वृंदावननगर, जुना कौठा, नांदेड येथे ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी नांदेड २४ फेब्रुवारी रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडच्या जुना कौठा येथील वृंदावन नगर येथील व्यापारी गिरीश सत्यनारायण कसट व त्यांचे आई, वडील हे २२ फेब्रुवारी रोजी प्रयागराजला गेले. याच दरम्यान, घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी रात्री साडेआठवाजेचे दरम्यान मुख्य दारावरील कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी १० ते १५ तोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रूपये असा एकूण अंदाजे पाच ते सात लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी व्यापारी गिरीश सत्यनारायण कसट यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे २४ फेब्रुवारी रोजी नांदेड ग्रामीण ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घरफोडीमुळे कौठा भागातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस दलाकडून सर्वत्र रात्रीची गस्त वाढवून व्यापाऱ्यांमध्ये पसरलेली भीती दूर करावी अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.