“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:16 IST2025-07-17T16:12:54+5:302025-07-17T16:16:50+5:30
Pratap Sarnaik News: एखाद्या प्रवाशाचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.

“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
Pratap Sarnaik News: एकीकडे आषाढी वारी आणि गणेशोत्सवानिमित्त एसटी बसच्या फेऱ्या वाढवल्या जात आहेत, आषाढी वारीतून एसटीला मिळालेल्या चांगल्या उत्पन्नाविषयी माहिती दिली जात आहे, तर दुसरीकडे एसटी महामंडळातील त्रुटी, एसटी बसची झालेली दुरवस्था यांसह अनेक मुद्द्यांमुळे एसटी महामंडळ चर्चेत आहे. यातच शिवनेरी बसची दुरवस्था, बंद पडणारी एसी यंत्रणा यावरून प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
एसटी महामंडळाच्या अनेक आगारांमध्ये नव्या बांधणीच्या बस दाखल होत आहेत. आगामी काळात हजारो बस खरेदी करण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे. नवीन बस खरेदी करून त्या मार्गावर येण्यास सुरुवातही झालेली पाहायला मिळत आहे. नव्या ढंगाच्या नव्या लालपरी बस प्रवाशांच्या पसंतीस उतरत असल्या, तरी जुन्या बसची संख्या अद्यापही मोठ्या प्रमाणावर आहे. या जुन्या बसमुळे प्रवाशांना अनेकदा समस्यांचा सामना करावा लागतो. शिवनेरी, शिवशाही बसमध्ये एसी यंत्रणा बिघडणे, बसमध्ये अस्वच्छता असणे, बसची देखभाल दुरुस्ती झालेली नसणे, अशा अनेक मुद्द्यांवरून प्रवासी वेळोवेळी संताप व्यक्त करत असतात. अशातच प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा, एखाद्या प्रवाशाचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.
प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा
'शिवनेरी' या एसी बसमधील बहुताश एसी यंत्रणा व्यवस्थित चालत नाही. मुंबई, सातारा, कोल्हापूर मार्गावरील बसमधून पाच ते सात तास प्रवास करावा लागतो. एसी यंत्रणा बंद, त्यात खिडक्या उघडण्याची सोय नसल्यामुळे प्रवाशांचा जीव गुदमरतो. प्रवाशांनी तक्रार करूनही काहीच उपयोग होत नाही. चालक व वाहक 'आम्ही काय करणार?' अशी हतबलता व्यक्त करत आहेत. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. एखाद्या प्रवाशाचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का? एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच या बसमधून प्रवास करावा, अशी प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करू लागले आहेत.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून महामंडळात अनागोंदी सुरू आहे. अधिकाऱ्यांकडून कामात निष्काळजीपणा, नुकसानीस प्रतिबंध न करणे, नियमावलीचा भंग करणे, नियमबाह्य खरेदी प्रक्रिया राबविणे, जास्त दराने खरेदी करणे, अतिरिक्त खरेदी करून रक्कम अडवून ठेवणे, न झालेली खरेदी दाखविणे, नोंदी ठेवण्यास दुर्लक्ष करणे, अधिकाराचा गैरवापर करणे, पुरेशी खातरजमा न करता जास्तीची रक्कम आदा करणे, वरिष्ठ लेखा अधिकाऱ्याकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार होत आहेत. तरीही या अधिकाऱ्यांची फक्त चौकशी झाली आहे. दोषी आढळूनही अधिकारी महामंडळात कायम आहे. अधिकाऱ्यांची चौकशी होऊन आरोप निश्चित झाले तरी ते त्याच जागी कायम राहतात. एसटी महामंडळात गेल्या काही वर्षांपासून काय चालले आहे, हे मलाही कळत नाही, असे उद्विग्न उद्गार खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात काढले.